हिमाचलमध्ये दरड कोसळली, २ ठार तर ३० जण बेपत्ता...

Update: 2021-08-11 12:43 GMT

हिमाचल प्रदेश च्या किन्नौर येथे बुधवारी(११ ऑगस्ट) दुपारी दरड कोसळल्याने २ वाहन चालकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सुमारे ३० जण बेपत्ता आहेत. रेकाँग पीओ-शिमला महामार्गावर दरड कोसळली. या दरडीमध्ये राज्य परिवहन मंडळाची बस, एक ट्रक आणि काही कार गाडल्या गेल्या. शिमलाला जाणाऱ्या या बसमधुन ४० जण प्रवास करत होते.




 


या दरडीमध्ये सुमारे २५-३० जण अडकले किंवा पुरले गेले आहेत, असे एका अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले. शिवाय दहा जणांना वाचवण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या (ITBP) सुमारे २०० तुकड्या बचाव कार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक पांडे यांनी माध्यमांना सांगितले की, "हा परिसर सध्या खूप धोकादायक आहे. आम्हाला आशा आहे की बचावकार्य रात्रभर सुरू राहील.




 


हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की एनडीआरएफला देखील पाचारण करण्यात आले आहे. याशिवाय ते म्हणाले, "मी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्हाला माहिती मिळाली आहे की एक बस आणि कार या दरडीखाली आलेली असू शकते. आम्ही तपशीलवार माहितीची वाट पाहत आहोत."




 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री ठाकूर यांच्याशी बोलून त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे गेल्या काही आठवड्यांत हिमाचल प्रदेशच्या बऱ्याच ठिकाणी भूस्खलन झाले आहे. गेल्या महिन्यात किन्नौरच्या दुसऱ्या भागात गाड्यांवर मोठे दगड पडल्याने नऊ पर्यटक ठार झाले होते.

Tags:    

Similar News