President Election : लालू प्रसाद यादव यांनी भरला राष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज?
देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीने वातावरण तापले आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांची मोट बांधून राष्ट्रपती पदासाठी एकच उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापार्श्वभुमीवर लालू प्रसाद यादव यांनी राष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
देशाचे 15 वे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा 24 जुलै रोजी राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ समाप्त होत आहे. त्यापार्श्वभुमीवर भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात केली आहे. तर बिहारमधून लालू प्रसाद यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले लालू प्रसाद यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे नेते नाहीत. तर ते सरणा येथील लालू प्रसाद यादव नावाचे सामान्य व्यक्ती आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र मतदार यादीत आपले नाव दर्शवणारी माहितीची कागदपत्रे जोडली नव्हती.
निवडणूक कार्यक्रम
देशाचे 15 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यापुर्वी 16 व्या राष्ट्रपतींची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम. १९५२ च्या कलम ४(१) राष्ट्रपती निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 29 जून असून 30 जून रोजी अर्जांची छाणणी करण्यात येणार आहे. त्यानंतर २ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. मात्र आवश्यकता पडल्यास 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणूकीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारच्या 15 जून 2022 च्या राजपत्रात पुन्हा प्रसिध्द करण्यात आली आहे.
राष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी
राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसंदर्भात ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या 22 नेत्यांना पत्र पाठवले होते. तर ही बैठक काल दिल्लीत पार पडली. यामध्ये विरोधी पक्षांकडून शरद पवार यांना राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी गळ घालण्यात आली होती. मात्र शरद पवार यांनी ट्वीट करून आपण राष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार नाहीत, असे स्पष्ट केले. त्यानंतर विरोधी पक्षाकडून दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. तर दुसरीकडे बिहारचे नेते असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी राष्ट्रपती पदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.