लखीमपूर खेरी: सर्वोच्च न्यायालयात केस गेल्यानंतर पोलिसांची मंत्र्याच्या मुलाला नोटीस
उत्तर प्रदेश लखीमपूर खेरी प्रकरणात, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर गाडी चालवण्याचा आरोप आहे. अद्यापर्यंत अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला पोलिसांनी अटक केलेली नाही. मात्र, या सर्व प्रकरणात शेतकऱ्यांनी ज्या आशिष मिश्रावर शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. त्याला अद्यापर्यंत चौकशीसाठी देखील बोलावलेले नाही.
दरम्यान लखीमपूर खेरी प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज स्वत: या घटनेची दखल घेत या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात उद्या सुनवाई पार पडणार आहे. त्यामुळं आता पोलिसांनी शेतकऱ्यांवर गाडी चालवण्याचा आरोप असलेल्या आशिष मिश्राला चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.
या संदर्भात माध्यमांशी बोलताना लखनऊ चे पोलिस अधिकारी लक्ष्मी सिंह म्हणाले, "आम्ही आज मुख्य आरोपीला समन्स पाठवत आहोत. आम्ही त्याचं स्टेटमेन्ट नोंदवू. त्या आधारावर आम्ही आणखी पुरावे गोळा करत आहोत".
दरम्यान या प्रकरणात 4 दिवसानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या कारने आंदोलकांना चिरडल्याचा आरोप झाल्यानंतर चार दिवसांनी ही कारवाई केली जात आहे. यूपी पोलिसांनी लवकुश राणा आणि आशिष पांडे नावाच्या दोन लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, मुख्य आरोपी मोकाटच असल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
रविवार, 3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे.