युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाल राऊत यांची निवड
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वाधिक ५ लाखांहून अधिक मते घेणाऱ्या कुणाल राऊत यांची आज प्रदेशाध्यक्ष पदी निवड घोषित करण्यात आली.;
अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी जारी केलेल्या पत्राद्वारे राऊत यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये, कुणाल राऊत यांनी तब्बल ५ लाखांहून अधिक मते घेऊन बाजी मारली होती. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीची केवळ औपचारिक घोषणा उरली होती. "कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांच्या कुशल नेतृत्वात आपण पक्ष कार्याला वाहून घ्याल व पक्ष बळकट कराल, असा मला विश्वास आहे," असे श्रीनिवास यांनी नियुक्तीच्या पत्रात म्हटले आहे. कुणाल राऊत यांना निवडणुकीत सर्वाधिक 5,48,267 मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवराज मोरे यांना 3,80,367 तर शरण बसवराज पाटील यांना 2,46,695 मते मिळाली होती. त्यामुळे राऊत यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा उरली होती.
युवक काँग्रेसच्या युवा मतदारांनी व राज्यातील युवा शक्तीनी माझ्यावर जो विश्वास दाखविला तो मी सार्थ करून दाखवेल, अशा शब्दात कुणाल राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचा आणि माझ्या निवडणुकीत मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी राहील,अशा शब्दांत त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. या निवडणुकीत मदत करणारे युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार शब्दांत मानणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.
कुणाल राऊत हे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पूत्र आहेत.विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. "संकल्प" या स्वयंसेवी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला.