कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं आहे. आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून आमदार चंद्रकांत जाधव यांच्यावर उपचार सुरू होते. निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जाधव हे एका महिन्यात आमदार म्हणून निवडून आले होते.
आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. मागील आठ दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
आमदार जाधव यांना दीड वर्षात दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. मध्यंतरी त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्यामुळे ते पुन्हा आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय झाले होते. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू त्यांना हैदराबाद मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
आमदार जाधव यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. निवडणुकीच्या आधी केवळ पंधरा दिवस काँग्रेसमध्ये प्रवेश करून 2019 साली त्यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता. अतिशय मनमिळावू आणि लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सगळ्यांचे लाडके आण्णा म्हणून ते परिचित होते.
कोल्हापुरातील फुटबॉल आणखी वाढावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केला होता. कोल्हापुरात पेठांमध्ये चंद्रकांत जाधव यांचा घराघरांत वावर असायचा. कोल्हापुरातील तालमी, कोल्हापुरातील सामाजिक संघटना यांना चंद्रकांत जाधव यांनी भरघोस मदत केली. आज आमदार जाधव यांच्या जाण्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.