किरीट सोमय्यांना नेमके म्हणायचेय काय?

Update: 2020-11-11 10:37 GMT

अर्णब गोस्वामीच्या अटकेवर सध्या कोर्टात मोठी लढाई सुरू आहे. आता तर सुप्रीम कोर्टात अर्णब गोस्वामीने धाव घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण या दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी "उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी एकत्रितपणे मार्च २०१४मध्ये अन्वय नाईक, अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील मुरूडमध्ये कोरलाई भागात २ कोटी २० लाख रुपये किमतीची जमीन खरेदी केली होती. अर्णबला लक्ष करण्यामागे हेच कारण आहे का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.

यावर रवींद्र वायकर यांनी उत्तर देत सोमय्यांना सवाल विचारला आहे.

"खरेदी झाली होती. हा व्यवहार कायदेशीर पद्धतीने झाला आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात या व्यवहाराचा उल्लेख केलेला आहे. आयकर विभागाला देखील याचे दस्ताऐवज दिलेले आहेत. त्यामुळे हा पारदर्शक व्यवहार असून विरोधक याचे राजकारण करत आहेत. लोकायुक्तांमार्फत या प्रकरणाची आधीच चौकशी झालेली आहे. आणखी काही चौकशी करायची असेल तर करु शकता. अन्वय नाईक यांनी जमीन विकल्यापेक्षा त्यांनी आत्महत्या कुणामुळे केली? याचा शोध घेतला पाहीजे." असा टोला त्यांनी लगावला आहे.

पण या आऱोपातून किरीट सोमय्यांना काय म्हणायचे आहे तेच स्पष्ट होत नाही. जमिनीचा व्यवहार झाला असेल तर त्यात वावगं काय आहे, अन्वय नाईक यांनी ६ वर्षांपूर्वी जमीन विकली होती. पण त्यांनी चार वर्षांनंतर आत्महत्या केली आणि रिपब्लिकच्या अर्णब गोस्वामींनी पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी आत्महत्या केली होती. मग या प्रकरणाचा संबंध सोमय्या का जोडण्याचा प्रयत्न करत आहेत असा सवालही आता उपस्थित होतो आहे.

Tags:    

Similar News