भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शिवसेनेचे इतर नेते यांच्यापर्यंत आरोप केले आहेत. याच संदर्भात किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. हा संघर्ष आता असा तीव्र झालेला असताना किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का दिला आहे. आता सोमय्या यांनी हा संघर्ष थेट कोर्टात नेला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये घोटाळ्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारे टेंडरची पारदर्शक प्रक्रिया न करता एका बोगस कंपनीला मुंबईतल्या अनेक कोविड सेंटरचे कंत्राट दिले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या बोगस कंपनीने जे पार्टनरशिप डिड व बाकी कागदपत्र दिले ते बोगस होते, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच अशा बोगस कंपन्यांना कोविड सेंटर चालवण्यास देणे म्हणजे हजारो कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळणे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेने देखील या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्याची बाब लपवली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ब्लॅकलिस्टड कंपनीला महापालिकेने ४ कोविड सेंटरचे काम दिले आहे. यामुळे लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीविरोधात आझाद मैदान कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुजित पाटकर हेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिका भागीदार असल्याचे सांगत किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात तक्रार देखील दाखल केली होती. आता या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल झाल्याने पुढील सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष असेल.