खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलीची बीड पोलिसांनी केली सुटका.
आष्टी पोलिसांनी इंदापूर-भिगवन परिसरातून मुलीची केली सुटका.;
मुलीचे अपहरण करुण 3 लाखांची खंडणी मागितल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. खंडणी वसुल करण्याच्या उद्देशाने एका अज्ञात इसमाने आष्टी शहरात राहणाऱ्या एका ठेकेदाराच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. सदरच्या घटनेचे गांभीर्य ओळखून सदर ठेकेदाराने याची तक्रार आष्टी पोलिसांत दिली. त्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे यांनी तपासाची चक्रे गतीमान करत या तपासासाठी पोलिसांचे एक पथक नियुक्त केले. याच दरम्यान खंडणी बहाद्दराकडून संबंधित ठेकेदारास 3 लाख रुपयांची मागणीचे फोनव येत होते.
दुसरीकडे आष्टी पोलीस आणि सायबर विभाग या फोनवर लक्ष ठेवून होता. तांत्रिक तपासाला वेग देत संबंधित आरोपी आणि पिडित मुलगी ही इंदापूर-भिगवन परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलिसांनी या भागात सापळा रचला. तेव्हा खंडणी बहाद्दरांनी पिडित मुलीस डांबून ठेवल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी अत्यंत गोपनियतेने आणि सावधपणे डांबून ठेवलेल्या ठिकाणावरून पिडित मुलीची सुटका करत तिला स्वत:च्या ताब्यात घेतले. याच दरम्यान संबंधित अपहरणकर्त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
अवघ्या 36 तासात आष्टी पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पो. अधिक्षक सचीन पांडकर, विभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पो.नि. हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. अजित चाटे, पो.ना. प्रवीण क्षीरसागर, विकास जाधव, महिला पोलीस स्वाती मुंडे, अंमलदार शिवप्रसाद तवले, सचीन कोळेकर यांनी केली.