#HijabControversy : वादावर कर्नाटक हायकोर्टाचा मोठा आदेश

कर्नाटक राज्यात हिजाब वाद पेटला असताना कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण आदेश दिला आहे.

Update: 2022-02-10 12:46 GMT

कर्नाटकमधील हिजाबच्या वादावर मोठा वाद निर्माण झालेला आहे. याच मुद्द्यावरुन कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली. कर्नाटकमधील काही कॉलेजेसमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालण्याची बंदी करण्यात आली आहे. त्यानंतर या वादाला सुरूवात झाली. याच मुद्द्यावरुन काही मुस्लिम विद्यार्थीनींनी हायकोर्टात याचिका दाखल करत हिजाबला परवानगी देण्याची मागणी केली आहे. यासर्व याचिकांवर हायकोर्टात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने महत्त्वाचे अंतरिम आदेश दिले आहेत.

राज्यातील शाळा- कॉलेजेस सुरू होणे गरजेचे आहे, तसेच शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असे सांगत मुख्य न्यायमूर्तींनी पुढील सुनावणी होईपर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये कुणीही धार्मिक वस्त्र परिधान करुन येऊ नये असे आदेश दिले आहेत. हे प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब घालून येतात तर मग हिंदू मुलं भगवे पट्टे गळ्यात घालून येतील अशी भूमिका घेत अनेक विद्यार्थ्यांनी भगवे पट्टे परिधान केले. त्यातच एका कॉलेजमध्ये मुस्लिम मुलीला अनेक विद्यार्थ्यांनी घेरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.

यासर्व वादानंतर हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. यावेळी न्या. कृष्णा दीक्षित यांच्यापुढे सुनावणी झाली. पण त्यांनी हा घटनात्मक प्रश्न असल्याने मोठ्या खंडपीठाकडे सुनावणी घेण्याचा निर्णय़ दिला. त्यानुसार मुख्य न्यायमूर्ती रितूराज अवस्थी, कृष्णा दीक्षित आणि जेएम काझी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये कोर्टाने शाळा- सकॉलेजमध्ये धार्मिक वस्त्र परिधान करण्यास बंदी घातली आहे.

दरम्यान हिजाबच्या वादावर गुरूवारी सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल करण्यात आली. याचिकाकर्त्यांच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. पण सुप्रीम कोर्टाने कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणार असल्याचे सांगत सध्या या याचिकेवर सुनावणी घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे

Tags:    

Similar News