रायगड – रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर कर्जत ते खोपोली दरम्यान रेल्वे ट्रँकच्या खालची माती पुरामुळे वाहून गेली आहे. पाण्याच्या वेगामुळे ट्रॅकच्या खालचा जमिनीचा मोठा भाग वाहून गेला आहे.
सध्या येथील रेल्वे ट्रँक अधांतरी असून किमान 15 दिवस हा ट्रॅक बंद राहण्याची शक्यता आहे. सीएसटी ते खोपोली लोकल वाहतुकीला यानमुळे फटका बसला आहे. कर्जत ते खोपोली दरम्यान केळवली व डोलवलीच्या मध्ये अनेक ठिकाणी ट्रँकखालची माती वाहुन गेली आहे. तर दोन नाल्याच्या दरम्यान रात्री पाणी जास्त आल्याने दोन्ही नाल्यांचे खाबंही वाहुन गेले आहे.
जिल्ह्यातील नद्यांना मोठा पूर आला आहे. तर सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्याने मुंबई-गोवा महामार्गाला वेढा दिला आहे. त्यामुळे महाड येथील नातेखिंड व इतर ठिकाणी महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी पुराचे पाणी आल्याने पाण्यात फसलेली वाहने व माणसे सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, प्रशासन व रेस्क्यू टीम काम करीत आहे.