राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सरकार विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष निर्माण झाला आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना अटक करण्यासाठी आता पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नितेश राणे यांचा शोध पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनअर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना नारायण राणे यांनाही आता कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
गुन्हयाचे तपाससाठी नारायण राणे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात हजर रहावे अशी नोटीस पोलिसांनी पाठवली आहे. पण राणे यांनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे. नितेश नारायण राणे हे पोलिसांनी सापडत नसून त्यांचा शोध सुरू आहे. नारायण राणे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराच्या प्रश्नावर नितेश राणे कुठे आहे हे सांगायला आपण मूर्ख नाही, माहिती असले तरी सांगणार नाही, असे वक्तव्य केले होते. माध्यमांमध्ये आलेल्या या वक्तव्याचा आधार घेत पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. नितेश राणे यांचा ठावठिकाणा नाराय़ण राणे यांना माहिती आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच ही नोटीस मिळताच आपण आरोपी नितेश राणे यांना पोलिसांसमोर हजर करावे अशी सूचना पोलिसांना केली आहे. तसेच गुन्हयाच्या तपशिलाबाबत जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावे असेही पोलिसांनी या नोटीशीत म्हटले आहे. त्यामुळे नारायण राणे आता काय भूमिका घेतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.