अटकेच्या धास्तीनं कंगना भगिनींची हायकोर्टात धाव
धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणारी अभिनेत्री कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांनी पोलिसांची तीन समन्स अनुपस्थित राहील्यानंतर आता अटकेची शक्यता निर्माण झाल्यावर आता वांद्रे न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या पोलीस चौकशीच्या आदेशाविरोधात कंगनानं आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.;
कोरोनाकाळात दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि समाजातील सौहार्दपूर्ण वातावरण व जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतूने सोशल मीडियावर वारंवार विधाने केल्याच्या आरोपांविषयी एफआयआर नोंदवण्याचे आदेश वांद्रे न्यायदंडाधिकारी कोर्टाने १६ ऑक्टोबर रोजी दिले होते.
त्यानंतर मुंबई पोलिसांनी १७ ऑक्टोबर रोजी कंगना व तिची बहीण रंगोली चंडेल हिच्या विरोधात एफआयआर नोंदवला. त्यात भारतीय दंड संहितेच्या १२४-अ (देशद्रोह) या कलमाबरोबरच १५३-अ (धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणे) व २९५-अ (धार्मिक भावनांना ठेच पोचवणे) या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला. त्याविरोधात कंगना व रंगोलीने फौजदारी रिट याचिका केली आहे. त्यात दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देण्याबरोबरच एफआयआर रद्द करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टर व फिटनेस ट्रेनर मुनावर अली सय्यद यानं कंगनाच्या विरोधात तक्रार केली होती. 'ट्विटरवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत याची जाणीव असूनही कंगनानं मागील दोन महिन्यांत अनेक आक्षेपार्ह ट्विट केले. बॉलिवूड म्हणजे वशिलेबाजी, पक्षपातीपणा, व्यसनाधीनता, जातीयवाद, खुनी लोकांचे केंद्र आहे, असे चित्र निर्माण करण्याचा तिने प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण बॉलिवूडची प्रतिमा जगभरात मलीन करण्याचा प्रयत्न तिने केला असून लोकांच्या मनातही पूर्वग्रह निर्माण झाले. पालघर साधू हत्याकांड व महापालिकेनं केलेल्या कारवाईला कंगनानं हिंदू-मुस्लिम असा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. महापालिकेला 'बाबर सेना' म्हणणे, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, करोनासाठी तबलिगी जमातींना जबाबदार धरणे, अशा प्रत्येक कृतीतून तिने तिचा हेतू दाखवून दिला.
वाचा: 'चार खासदार निवडून आणणारे लोकनेते, मग मोदींना काय म्हणायचे?'
'बॉलिवूडच्या शतकभराच्या इतिहासात मराठांना अभिमानास्पद असा एकही सिनेमा काढण्यात आला नाही. इस्लामचे वर्चस्व असलेल्या सिनेसृष्टीत शिवाजी महाराज व राणी लक्ष्मीबाईंवर सिनेमा बनवला, असं तिनं एका ट्विटमध्ये म्हटलं होतं. सिनेसृष्टी व इस्लामचा काहीही संबंध नसताना वारंवार धार्मिक रंग देऊन कंगनानं माझ्यासह अनेकांच्या भावना दुखावल्या. सिनेसृष्टीतील कलाकारांबरोबरच सर्वसामान्यांमध्येही हिंदू-मुस्लिम दुही निर्माण करण्याचा अश्लाघ्य प्रकार करून राज्यघटना व कायदे पायदळी तुडवले.
मुख्यमंत्री व राज्य सरकारच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोचवून सर्वसामान्यांच्या मनात सरकारची प्रतिमा मलीन करण्याचे प्रकार तिने वारंवार केले', अशी तक्रार मुनावर अली सय्यद यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे म्हणत मुनावर यांनी वांद्रे न्यायदंडाधिकारी कोर्टात अॅड. रवीश जमींदार यांच्यामार्फत फौजदारी दंड संहितेच्या कलम १५६(३) अंतर्गत खासगी तक्रार दाखल केली होती. तिथं त्यांनी वरील मुद्दे कोर्टाच्या निदर्शनास आणले. त्याची दखल घेत कोर्टाने कलम १५६(३) अन्वये एफआयआर नोंदवून कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.