पत्रकार विनोद दुआ यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना दिल्लीतील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका हिने आपल्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे.
विनोद दुआ हे ६७ वर्षांचे असून पत्रकारितेतील एक मोठे नाव आहे. त्यांनी 'एनडीटीव्ही' आणि 'दूरदर्शन' साठीही काम केले आहे. विनोद दुआ आणि त्यांच्या पत्नीला कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत गुरुग्राममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून विनोद दुआ यांच्या प्रकृतीत सातत्याने घसरण होत आहे.
देशद्रोहाचा खटला...
काही महिन्यांपूर्वी विनोद दुआ यांच्यावरील देशद्रोहाचा खटला न्यायालयाने फेटाळला होता. दिल्ली दंगलीवरील विनोद दुआ त्यांच्या यूट्यूब शोवर भाजपच्या स्थानिक नेत्याने गेल्या वर्षी देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. एफआयआरमध्ये, त्यांच्यावर खोट्या बातम्या पसरवणे, सार्वजनिक उपद्रव निर्माण करणे, बदनामीकारक साहित्य प्रकाशित करणे आणि सार्वजनिक ठिकाणी खोटी विधाने केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या एफआयआरविरोधात विनोद दुआ सर्वोच्च न्यायालयात गेले होते.