राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसा ढवळया हत्त्या करणाऱ्या रिफायनरीचा दलाल पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर भादवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा बनाव करून पत्रकाराची ठरवून हत्त्या केल्याचे चौकशी अंती स्पष्ट झाल्यानंतर आंबेरकर विरूध्द खुनाचे कलम लावण्यात आले आहे..
पत्रकार शशिकांत शंकर वारीशे वय ४५ रा. कशेळी राजपूर कोदवली येथील पेट्रोल पंपात दुचाकीत पेट्रोल भरून बाहेर पडत असताना हा भीषण अपघात झाला आहे. पंपाबाहेर पडत असताना समोरून भरधाव वेगात येत असलेल्या महेंद्रा धार गाडी (क्रमांक एमएच 08 एएक्स 6100) या गाडीच्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार वारीशे हे खाली पडले तर त्यांची दुचाकी महिंद्रा धार गाडीबरोबर फरफटत सुमारे २०० ते २५० फुट पुढे गेले या भीषण अपघातात वारीशे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे. येथील स्थानिकांनी त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करता हलवले होते. पण प्रकृती अधीक गंभीर झाल्याने त्यांना तातडीने कोल्हापूर येथे हलवण्यात आलं आहे. या भीषण अपघाताचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी राजापूर येथे येऊन घटनास्थळाची पाहणी करून या सगळ्या अपघाताची माहिती घेतली होती.
पत्रकार शशिकांत वारीशे यांचा घातपात घडवून आणल्याचा संशय व्यक्त झाल्याने जिल्हयात एकच खळबळ उडाली होती. पत्रकार शशिकांत वारीशे हे मूळचे राजापूर कशेळी गावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा असा परिवार आहे. या अपघात प्रकरणी शशिकांत वारीशे यांच्या बहिणीचे पती यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले शशिकांत वारीशे यांना कोल्हापूर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
रत्नागिरी येथील सर्व पत्रकार तसेच मराठी पत्रकार परिषदेने देखील पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.. त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती.. या दबावाचा अखेर फायदा झाला असून पोलिसांनी आंबेरकर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.. आंबेरकर याच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम देखील लावले जावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली आहे...