सातारा लोकसभा मतदार संघात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेसाठी शरद पवार यांनी घेतलेल्या सभेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झालं. पवारांच्या या सभेने महाराष्ट्र विधानसभेचं गणित पालटलं होतं. दिल्ली पासून गल्ली पर्यंत याच सभेची चर्चा होती. '80 वर्षाचा योध्दा' अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण करणाऱ्या शरद पवारांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली होती.
आता शरद पवार यांच्या या सभेची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडन यांच्या भाषणाशी केली जात आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडन यांनी भर पावसात सभा घेत जनतेला संबोधित केलं आहे. जगाला दिशा दाखवणारे एकच नाव 'साहेब' अशा आषयाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
दरम्यान साताऱ्यातील या सभेमध्ये शरद पवार यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली होती.'निवडणुकीत विरोधकच नाही, असे (तत्कालीन) मुख्यमंत्री म्हणतात. मात्र, आम्हाला दुसऱ्या बाजूला तोडीचे पैलवानच दिसत नाही. आमच्या नेत्यांनी आजवर अनेक पैलवान तयार केले. भाजपला पैलवान आणि कुस्ती हे शब्द शोधत नाहीत', असं शरद पवार म्हणाले होते.