एकीकडे लोकसभेत सोमवारी भाजपच्या खासदारांनी महाराष्ट्रातील परमबीर सिंग यांचे प्रकरण उचलत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. पण याचवेळी संसदेत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. संसदेत जामर असताना फक्त जिओ कंपनीचे नेटवर्क कसे चालते, असा सवाल त्यांनी विचारला. संसदेत BSNL, MTNL या सरकारी कंपन्यांचे नेटवर्कही चालत नाही पण एकाच कंपनीचे संसदेत नेटवर्क कसे चालते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे बारणे यांनी या मुद्दा उपस्थित केला तेव्हा जिओचं नाव येताच पीठासीन अधिका-यांची प्रतिक्रिया अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली. पीठासीन अधिकारी असलेल्या रमा देवी यांनी तुम्ही हा मुद्दा मांडू शकत नाहीत, माननीय अध्यक्ष याबद्दल विचार करतील असे सांगत हा विषय गुंडाळला. एवढेच नाही तर बारणे यांचे बोलणे सुरू असतानाच त्यांनी दुसऱ्या सदस्यांचे नाव पुकारत हा विषय पुढे जाऊच दिला नाही.