अलमट्टी: पश्चिम महाराष्ट्राला पुराचा धोका, जयंत पाटील कर्नाटकला जाणार...
jayant patil on almatti dam water issue Jayant Patil going to Karnataka
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्याची पाणी पातळी वाढली आहे. ही बाब लक्षात घेता, अलमट्टी धरणातून होणार्या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीला सामोरे जावं लागू शकतं. त्यामुळे या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी सकाळी १०.३० वाजता बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. Jayant Patil On Almatti Dam Water Issue
जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे. ही थेट चर्चा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी होणार आहे. त्यासाठी त्यांनी शनिवारी सकाळी १०.३० वाजताची वेळ दिल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते. त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.