गृहमंत्री 'पालक' असूनही गोंदियात जातपंचायत. आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरूणाला जातपंचायतीने दिली शिक्षा

पुरोगाम म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात जातपंचायत अस्तित्वात असून आंतरजातीय विवाह करणाऱ्या एका तरुणाला शिक्षा केली गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गृहमंत्रीच पालकमंत्री असलेल्या गोंदिया जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.;

Update: 2020-12-19 03:38 GMT

पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आणखी एक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. दुसऱ्या समाजाच्या मुलीशी प्रेमविवास केलेल्या तरुणाला जातपंचायतीने दंड ठोठावून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. त्या तरुणाच्या कुटुंबाला बहिष्कृत करत वाळीत टाकण्यात आले आणि दंड रूपाने 1 लाख रुपये किंवा 50 हजार रूपये भरण्याचे फर्मान जातपंतचायतीने सुनावले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे पालकमंत्री असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील जरताळ इथे हा प्रकार घडला आहे.

प्रकरण नेमके काय?

गोंदिया जिल्ह्यातील जरताळ येथील गुलाब रमेश अजितवार यांनी दुसऱ्या जातीच्या तरुणीशी नागपुर येथे 17 ऑक्टोबर रोजी लग्न केले. लग्नानंतर 9 डिसेंबर रोजी ते गावात परत आले. पण गावात आल्यानंतर 15 डिसेंबर रोजी दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न केले म्हणून गावात शिक्षेसाठी कतिया समाजाची जातपंचायत भरली. यामध्ये दंड रूपात 1 लाख ते 50 हजार रुपये दंड ठोठावला गेला. मात्र आपण गरीब असल्याने केवळ एक हजार रुपये भरु शकत असल्याचे पीड़ित गुलाब यांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे गुलाब यांना मदत करणाऱ्या मनोज अजितवार ह्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. पण पैसे भरु न शकल्यामुळे पीड़ित गुलाब, अजितवार यांच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आले. गावाने त्यांना वाळीत टाकल्याचा आरोपही गुलाब यांनी केला आहे. याप्रकरणी गुलाब यांचे मित्र मनोज अजीतवार यांनी दिलेल्य़ा तक्रारीवरुन 3 व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Tags:    

Similar News