आता पोर्नोग्राफी आणि अश्लिलतेवर नियंत्रण येणार : गृहमंत्री अनिल देशमुख

ओटीटी आणि समाजमाध्यमांवर आता थेट केंद्र सरकारी नियंत्रणामुळे आता पोर्नोग्राफी आणि अश्लिलतेवर नियंत्रण येईल असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

Update: 2020-11-12 12:21 GMT

डिजिटल माध्यमांवर केंद्र शासनाचे निश्चितच लक्ष असणे ही बाब समाधानकारक आहे. याची अधिसूचना नुकतीच काढण्यात आली असून केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे यावर नियंत्रण असणार आहे. देशातील विविध माध्यमे हे कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या निगराणीत व त्यांच्या नियमांच्या अखत्यारित राहून काम करत असतात. ओटीटी प्लॅटफोर्मस्‌वर मात्र अशा कोणत्याही प्रकारच्या संस्थेचे नियंत्रण नव्हते.

मध्यंतरी महाराष्ट्राच्या सायबर सेलने अश्लिलता व महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या प्रॉडक्शनवर कारवाई करत भा.द.वि.297, 67, 68, (9) च्या अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करताना कोणत्याही व्यावसायिक दबावाखाली येऊन स्त्रियांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही ह्याची काळजी घेणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. केंद्र शासनाच्या ह्या अधिसुचनेमुळे अशा सर्व गोष्टींवर निर्बंध घालणे शक्य होईल, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

या अधिसूचनेनुसार अमेझॉन हॉटस्टार नेटफ्लिक्स प्राईम व्हिडिओ तसेच अन्य ओटीटी मंच वेब सिरीज, चित्रपट, लघुपट, निवेदन पट अशा प्रकारच्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमावर या मंत्रालयाचे नियंत्रण असणार आहे. त्यामुळे या माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमावर मजकूरावर नियंत्रण ठैवता येईल. पोर्नोग्राफी अथवा अश्लिलता याबाबत योग्य ते नियंत्रण ठेवले जाईल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

Tags:    

Similar News