निखिल वागळे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे - राजन क्षीरसागर
काल पुण्यात झालेल्या निर्भय बनो या कार्यक्रमास जाताना जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी आणि अॅड असिम सरोदे यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो अत्यंत निंदनीय आहे अशावेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे महाराष्ट्र राज्यात सद्सद्विवेकबुद्धी शाबूत असलेल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, यापूर्वीच आपण विवेक बुद्धी असणारे दाभोळकर पानसरे कलबुर्गी यासारख्यांना गमाविले आहे, असं वक्तव्य भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक वालवरून केलं आहे.
"गाडीखाली येऊन कुत्रा मरावा" अशी भाषा करणारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचे पोलिस हे फॅसिस्ट गुंडाना सामील असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र राज्यात रोज सुरु असलेल्या हिंसक घटना, दंगली पेटविण्यासाठी रोजच सुरू असलेल्या अफवा आणि कारस्थाने, समाजाच्या विविध घटकांमध्ये विकृष्ट आणि द्वेष पसरवण्यासाठी केले जाणारे खेळ आपण पहात असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्यात सत्ताधारी यांच्या जनविरोधी धोरणांमुळे मेटाकुटीला आलेले शेतकरी, उध्वस्त होत असलेले कामगार आणि मजूर, गलितगात्र बनलेला मध्यमवर्गीय, यांच्या आशा आकांक्षांचा चुराडा केला जात आहे. महाराष्ट्र कधी नव्हे इतका उध्वस्त होत आहे यात लोकशाही आणि विचार स्वातंत्र्य टिकविणे याची सर्वात पहिली गरज आहे. खोकेबाज दरोडेखोरांची आणि देशद्रोही नथुरामाची ही अभद्र युती असलेल्या सत्ताधाऱ्यांना धुळ चारणे गरजेचे बनले असल्याचेही मत राजन यांनी मांडले आहे.