पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत नोव्हेंबरनंतर मोफत रेशन मिळणे कठीण
नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKY) अंतर्गत गरीबांना नोव्हेंबरनंतर मोफत रेशन मिळणे कठीण आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी याबाबत बोलताना सांगितले की, सध्या नोव्हेंबरनंतर या योजनेअंतर्गत गरिबांना रेशन देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. मागील वर्षी कोरोनाच्या काळापासून गरीब कुटुंबांना केंद्र सरकारकडून मोफत रेशन दिले जात आहे. जून महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी ही योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. मार्च 2020 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना एप्रिल ते जून 2020 पर्यंत होती. त्यानंतर नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली.
अन्न सचिव पांडे म्हणाले की, अर्थव्यवस्था आता सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्याची कोणतीही योजना नाही. आमची OMSS देखील यावर्षी चांगली राहिली आहे.
खाद्यतेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली. अनेक ठिकाणी 20, 18, 10, 7 रुपयांपर्यंतची घसरण पाहायला मिळत आहे. यापूर्वी या तेलांवर २.५ टक्के शुल्क होते ते आता रद्द करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.त्यातूनही दिलासा मिळाला आहे असं पांडे म्हणाले.