ऑक्सिजन टंचाई: दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गेल्या 24 तासांत 25 रुग्णांचा मृत्यू
अनेक रुग्णालयाने ऑक्सिजनसाठी थेट न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे.;
देशाची राजधानी दिल्लीत ऑक्सिजनची मोठ्याप्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. अनेक रूग्णालयात काही तासांसाठी ऑक्सिजन शिल्लक आहे, तर काही ठिकाणी शेवटच्या क्षणाला ऑक्सीजन मिळत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी विविध रुग्णालयांकडून सरकारकडे केली जात आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गेल्या 24 तासांत 25 रुग्णांचा मृत्यू झालं असल्याचं, रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. तर आमच्याकडे आता काही तास पुरेल एवढच ऑक्सिजन शिल्लक असल्याचं सुद्धा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
तसेच व्हेंटिलेटर सुद्धा काम करत नसून, तात्काळ एयरलिफ्टच्या मदतीने ऑक्सिजन मिळाले पाहिजे. अन्यथा 60 लोकांचा जीव धोक्यात असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर अखेर 10 वाजता सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजन पोहचले.
दिल्लीत अनेक रुग्णालयात ऑक्सिजनची टंचाई पाहायला मिळत आहे.राज्य सरकार वेळोवेळी केंद्र सरकारकडे ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहे.केंद्राकडून सुद्धा ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने तोही पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयाने ऑक्सिजनसाठी थेट न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे.