औरंगाबादचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय?, भाजपचा सवाल
औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने औरंगाबादचे राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. त्यातच औरंगाबाद शहरातील खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठीच्या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांना शिवसेनेच्या आमदार, खासदारांची नावं दिल्याने नवा वाद पेटला आहे. त्यावर भाजपने सडकून टीका केली आहे.;
औरंगाबाद महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शहरातील राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. त्यातच राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खाम नदीचे पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत विकासकामांना आमदार खासदारांची नावे देण्यात आली. त्यावरून भाजपने जोरदार टीका केली.
औरंगाबाद शहरातील खाम नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत केलेल्या विकासकामांना आमदार खासदारांची नावे देण्यात आल्याने भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी आक्रमक भुमिका घेतली. तसेच संजय केणेकर म्हणाले की, खाम नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पातील विकासकामांना आमदार खासदारांची नावे देण्याची काय गरज? औरंगाबाद शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय? असा सवाल संजय केणेकर यांनी केला.
औरंगाबाद शहरातील महापालिका, स्मार्ट सिटी, छावणी परीषद या संस्थांचे त्यात योगदान आहे. तसेच सरकारच्या माझी वसुंधरा योजनेचाही या उपक्रमाला हातभार लागला आहे. पण तरीही या विकासकामांना आमदार खासदारांची नावे का? असा सवाल करत या हुजरेगिरी विरोधात भाजप जोरदार आंदोलन करणार असल्याचे संजय केणेकर यांनी सांगितले.
दरम्यान आमदार, खासदारांनी आम्हाला न विचारताच महापालिका प्रशासनाने आमची विविध प्रकल्पांना नावे दिल्याचे सांगितल्याने महापालिका प्रशासनाची गोची झाली आहे. तर आमदार खासदारांनी नावे काढून घेण्यासाठीचे पत्र महापालिका प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे म्हटले.