या देशात न्याय आहे की नाही, जयंत पाटील यांचा सवाल

राज्यात भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याची टीका करण्यात येत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab malik) यांच्यावर गुन्हा सिध्द न होता त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या देशात न्याय आहे की नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांनी केला.

Update: 2022-04-11 02:46 GMT

जयंत पाटील अमरावती येथे राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले की, भाजपकडून सरकार पाडण्याच्या तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. तर तारखा देऊनही सरकार पडत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. मात्र भाजपने कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा सिध्द न होताही त्यांना अनेक महिन्यांपासून अटकेत ठेवण्यात आले आहे. याबरोबरच अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर तुम्ही आणखी एखाद्या मंत्र्याचे नाव घ्या, तुम्हाला सोडू असा दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला.

तसेच जयंत पाटील म्हणाले, नवाब मलिक यांच्यावरचा गुन्हा सिध्द झाला नाही. मात्र तरीही त्यांनी महिन्यापासून तुरूंगात अडकवले आहे. छगन भुजबळ( Chhagan Bhujbal) यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावरही गुन्हा सिध्द झाला नसताना त्यांना शिक्षा भोगावी लागली. तर त्यानंतर त्यांना न्यायालयाने क्लिनचीट दिली. त्यामुळे अशा प्रकारे गुन्हा सिध्द झाला नसतानाही जर नेत्यांना कोठडी भोगावी लागत असेल तर देशात न्याय आहे की नाही असा प्रश्न पडत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.



Tags:    

Similar News