निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत कोरोना चिरडून मेला काय?
देशभरात कोरोना संसर्ग वाढत असताना लॉकडाऊनचा पुन्हा धोका कायम आहे.पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. भाजपकडून या निवडणूक प्रचारात कोरेना नियम पायदळी तुडवल्याने सामना संपादकीय मधून निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत कोरोना चिरडून मेला काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने जात आहे काय? असे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनावर लस आली आहे. लोक रांगा लावून लस घेत आहेत. लस आल्यामुळे लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असतानाच महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत, त्यात महाराष्ट्राचा आकडा जास्त आहे ही बाब चिंता करण्यासारखीच आहे. महाराष्ट्रात रोज सरासरी 10 हजार नवे रुग्ण कोरोनाच्या विळख्यात येत आहेत व 70-75 जणांचे बळी जात आहेत. प्रशासनाने अनेक भागांत अंशतः लॉक डाऊन सुरू केले. ठाणे, नाशिकसारख्या शहरी भागांत कोरोनाचे 'हॉट स्पॉट' निर्माण झाले.
विदर्भ-मराठवाडय़ातील अनेक भागांत चिंता वाटावी अशा पद्धतीने कोरोना उसळत आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूरसारख्या शहरांत लोकांनी गर्दी केली. बाजार, मॉल्स, लग्न समारंभात निर्बंध पाळले नाहीत. मंदिरे उघडायला लावली. लोकल ट्रेन्स सुरू करण्याचा आग्रह धरल्यामुळे कोरोना वाढला, असे जे बोलले जात आहे ते खरे मानले तर प. बंगालातील विधानसभा निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत कोरोना चिरडून मेला काय? पंतप्रधान मोदी, अमित शहा, ममता बॅनर्जी, डावे पक्ष यांच्या सभांना, पदयात्रांना 'मास्क' वगैरे न लावता, शारीरिक अंतर न पाळता गर्दी होत आहे, पण मुंबईतील लोकल ट्रेन्स, कामधंद्याच्या ठिकाणी गर्दीमुळे कोरोना वाढल्याची माहिती दिली जात आहे. पाच राज्यांत निवडणुका आहेत व प्रत्येक राज्यात वाजतगाजत प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहेत.
ई- श्रीधरण 84 वर्षांचे 'मेट्रो मॅन'भाजपने केरळातील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून कोरोनाची ऐशी की तैशीच करून टाकली. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचे सगळय़ात जास्त भय आहे व या काळात साठी पार केलेल्या नागरिकांनी बाहेर पडू नये असे कोरोनाबाबतचे संकेत आहेत, ते पायदळी तुडवून 84 वर्षांच्या श्रीधरन यांना भाजपने राजकीय मैदानात उतरवले हे आश्चर्यच आहे. कोरोनास पायघडय़ा घालण्याचे उपद्व्याप सर्वत्रच सुरू आहेत व हा लोकांच्या जिवाशी खेळ आहे याची फिकीर कुणास नाही. प. बंगालात भाजपास विजयी पताका फडकवायची आहे, पण त्याबाबत निदान पंतप्रधानांनी तरी कोरोनासंदर्भातील वैद्यकीय प्रोटोकॉल पाळायला नको होते काय? कोरोना हे संकट इतक्या लवकर संपेल असे आज तरी दिसत नाही. महाराष्ट्रात कोरोना वाढतो आहे याची चिंता दिल्लीश्वरांना आहे.
त्याबाबत त्यांचे आभार मानावे तेवढे थेडेच, पण कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्राला तुम्ही काय मदत करीत आहात ते सांगा. तुमच्या वांझ चिंतेने महाराष्ट्राला काय फायदा? कोरोनामुळे महाराष्ट्राच्या महसुली उत्पन्नात एक लाख कोटींपेक्षा जास्त घाटा झाला आहे. राज्यातील प्रतिव्यक्ती उत्पन्न घटले आहे. रोजगारावर संकट निर्माण झाले आहे. कोरोना संक्रमितांची इस्पितळातील गर्दी वाढू लागली आहे. त्याचाही बोजा वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात 56 टक्के वाढ एकटय़ा महाराष्ट्रात आहे असे सांगितले गेले, पण दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 42 टक्क्यांनी वाढली आहे हेसुद्धा तितकेच खरे. महाराष्ट्रात आकडे लपवले जात नाहीत व इतर राज्यांत अशानाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. हरयाणात कोरोनाचे प्रकरण गंभीर होत चालले आहे. महाराष्ट्र, केरळ, तामीळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि पंजाबात रोजच आकडे वाढत आहेत. त्यापैकी तामीळनाडू व केरळात निवडणुका आहेत. प. बंगालात कोरोनाचा तसा जोर नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगितले जात आहे. बहुधा पंतप्रधानांच्या सभा, भाजप नेत्यांचे भव्य प्रचार दौरे सुरळीत पार पडेपर्यंत कोरोना प. बंगालमध्ये नाहीच, असे सांगितले जाईल.
राजकारण हे अशा प्रकारे क्रूर किंवा अमानुष पद्धतीने सुरू आहे. बिहार निवडणुकीतही मोदी-शहा यांनी मोठय़ा सभा घेतल्या. तेथेही कोरोनासंदर्भातले वैद्यकीय निर्बंध कोणी पाळले नाहीत, पण आता महाराष्ट्राच्या स्थितीबाबत सगळय़ांनाच घोर लागून राहिला आहे. मुंबईत कोरोना वाढला त्याचे खापर 'लोकल ट्रेन्स'वर फोडले जात आहे. तसे असेल तर दिल्लीतही 'मेट्रो' सुरू आहेत. लोकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी. स्वतःवरच काही निर्बंध घालून जगायला हवे. पंतप्रधान हजारोंच्या सभा घेतात, गृहमंत्री शहा 'रोड शो' करतात म्हणून ते स्वातंत्र्य सामान्य नागरिकांना नाही. लोकांनी स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायलाच हवी. दिल्लीश्वरांना कदाचित दैवी शक्ती प्राप्त झाल्यामुळे 'कोरोना' त्यांना स्पर्श करीत नसेल, पण सामान्य जनांचे तसे नाही. काळजी घ्या नाहीतर लॉक डाऊन व कडक निर्बंध अटळ आहेत असे वातावरण तयार झाले आहे!