जयपूर-मुंबई रेल्वेमध्ये अंदाधुंद गोळीबार करून चार जणांचा बळी घेणाऱा रेल्वे पोलीस दलाचा शिपाई चेतन सिंह (वय ३३) हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या. मात्र, यासंदर्भात आता रेल्वे प्रशासनानंच मोठा खुलासा केलाय.
चेतन सिंह याने त्याचे वरिष्ठ टिकाराम मीणा आणि अन्य तीन प्रवाशांना त्याच्या शासकीय बंदुकीतून गोळ्या झाडल्या. ही घटना सोमवारी पालघर रेल्वे स्टेशनच्या जवळ घडली होती. त्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असतांना ताब्यात घेतलंय. सध्या चेतन सिंह ला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
या घटनेनंतर माध्यमांनी चेतन हा मानसिक आजारी असल्याचं म्हटलं होतं. त्याच्यावर उपचारही सुरू असल्याच्या बातम्याही समोर आल्या. मात्र, यासंदर्भात रेल्वे प्रशासनानंच एका प्रेस नोटद्वारे चेतन आजारी नसल्याचं स्पष्ट केलंय. रेल्वे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. त्या चाचणीतही चेतन आजारी नसल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं रेल्वेच्या हवाल्यानं दिलंय. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी ही बोरीवली च्या जीआरपी कडून करण्यात येत असल्याचंही रेल्वेनं स्पष्ट केलंय.