अर्नब गोस्वामी देव आहे का ? नाईक कुटुंबियांचा प्रश्न

Update: 2020-11-06 10:03 GMT

अर्णब गोस्वामीसह तीन व्यक्तींनी आत्महत्या करण्यास भाग पाडले, अशा आशयाची चिठ्ठी अन्वय यांनी आत्महत्येपूर्वी लिहिली होती. अलिबाग पोलिसांनी गुन्ह्य़ाचा तपास बंद का केला. तक्रार मागे घ्यावी यासाठी अलिबाग पोलिसांनी दबाव आणला, तत्पूर्वी अर्णब यांचा जबाब मुंबईतील एका सहआयुक्ताच्या कार्यालयात का नोंदवला गेला, असे प्रश्न उपस्थित करून नाईक कुटुंबाने या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.काँकर्ड डिझाइन कंपनीचे संचालक अन्वय आणि त्यांची आई कुमुद यांनी दोन वर्षांपूर्वी अलिबाग येथील शेतघरी (फार्म हाऊस) आत्महत्या केली.अलिबाग पोलिसांना शेतघरातून एक चिठ्ठी सापडली. त्यात अन्वय यांनी अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नीतेश सारडा यांनी अनुक्रमे ८३ लाख, चार कोटी आणि ५५ लाख रुपयांची देणी थकविल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आमच्या आत्महत्येसाठी या तिघांना जबाबदार धरून कारवाई करावी, असे नमूद केले होते. त्यानुसार या तिघांविरोधात अन्वय आणि कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंदवला होता.

अर्णब यांच्यामुळेच अन्वय यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू शकले नाहीत. ही रक्कम अर्णब यांनी अदा केली असती तर अन्वय आणि सासू कुमुद यांनी नाहक जीव गमावला नसता. थकलेल्या रक्कमेबाबत अन्वय यांनी अर्णब यांना भेटण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. अगदी पाच मिनिटे तरी वेळ द्यावा, अशी विनंती त्यांनी अनेकदा करून पाहिली होती. मात्र अर्णब यांनी अखेपर्यंत अन्वय यांना भेट नाकारली, असा दावा अक्षता यांनी केला.रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अनील पारसकर यांनी वारंवार तपास सुरू आहे, असेच सांगितले. प्रत्यक्षात तपासात काहीच प्रगती झाली नाही. उलट हा तपास पोलिसांनी गुपचूप बंद केला. तपास बंद केल्याची बाब पोलिसांनी दडवली. अन्वय यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवरून व्हायरल केली. ती पाहून रिपब्लिक वाहिनीने एक ट्वीट करून हे प्रकरण पोलिसांनी बंद केल्याचा दावा केला. त्यामुळे ही बाब समजली, असेही अक्षता यांनी सांगितले.

या प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी सुरेश वऱ्हाडे यांनी हे प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणला. तक्रार मागे घेण्याबाबतच्या कागदापत्रांवर वऱ्हाडे यांनी आमची स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केल्यानंतर सतत धमक्या सुरू झाल्या. निवासस्थानी, कार्यालयांत अनोळखी व्यक्ती येऊ लागल्या. पाठलाग सुरू झाला. याबाबत मुरबाड आणि दादर पोलीस ठाण्यात आम्ही तक्रारी नोंदवल्या, असा दावा अन्वय यांची कन्या आज्ञाने केला. सीआरपीसी अंतर्गत आरोपीचा जबाब नोंदवण्यासाठी सक्षम पोलिस अधिकाऱ्याला अधिकार आहेत. त्याअंतर्गतच अर्नब गोस्वामीची चौकशी पोलिस सहआयुक्तांकडे झाली असेल. गुन्हा अलिबागमधे नोंदवला असल्याने मुंबईतच जबाब नोंदवण्याची संधी देणे हा तक्रारदारावर अन्याय असल्याचे कायदे क्षेत्रातील तज्ञ सांगतात. याबाबत भविष्यातील न्यायालयीन सुनावणीमधे निश्चितपणे प्रकाश पडेल असे त्यांनी सांगितले.

वडिलांनी रिपब्लिक वाहिनीचे सुमारे साडेसहा कोटींचे काम केले होते. एक कोटींहून अधिक रक्कम वाहिनीकडून येणार होती. मात्र अर्णब यांनी घासघीस करून ती रक्कम ८३ लाखांवर आणली. शेख यांच्याकडून चार कोटी तर सारडा यांच्याकडून ५५ लाख इतके येणे होते. कंत्राटदार, कामगारांनी पैशांसाठी तगादा लावला होता. रक्कम अडकून पडल्याने अन्य अडचणीही उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे अन्वय तणावात होते, असेही आज्ञा हिने स्पष्ट केले.

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी अर्णब गोस्वामी यांच्यामुळेचं नाईक यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या गुन्ह्यात 'रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक अर्णव गोस्वामीचा जबाब रायगड ऐवजी मुंबईत नोंदवण्यात आला होता. त्यासाठी फडणवीस सरकारमधील एका मंत्र्यानं हस्तक्षेप केला होता,' असा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.अन्वय यांनी २०१८ साली आत्महत्या केली होती. राज्यात तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. अर्णव गोस्वामी यांचं नाव या गुन्हयात पुढे आल्यानंतर नियमानुसार, त्यांचा जबाब जिथं घटना घडली व गुन्हा दाखल झाला, तिथं नोंदवणं गरजेचं होतं. मात्र, एका नेत्यानं यात हस्तक्षेप करत तपास अधिकारी अनिल पारसकर यांना मुंबई पोलीस आयुक्तालयातील सह पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात अर्णव यांचा जबाब नोंदवण्यास भाग पाडलं. पारसकर यांना २६ मे २०१८ रोजी तशा सूचना दिल्या गेल्या. त्यानंतर ३० मे रोजी गोस्वामी यांचा जबाब नोंदवण्यात आला,' असं देशमुख म्हणाले.

Tags:    

Similar News