हॉस्पिटलचा हलगर्जीपणा भोवला, मुलाच्या जन्माच्या आनंदाऐवजी केदारे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या अनेक घटना रोज कानावर पडतात. त्याची चर्चा होते आणि या घटना मागे पडतात. अशीच एक घटना मोहम्मद अली रोड येथील नूर हॉस्पिटलमध्ये घडलीय.;
तारीख होती ८ जुलै २०२३
ठिकाण भायखळा
दुपारची वेळ
प्रज्ञाच्या डिलिव्हरीसाठी नूर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बोलावलं होतं. प्रज्ञाला बाळ होणार म्हणून घरात सगळे आनंदी होते. त्यातच नूर हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरी केली जाते. त्यामुळे आम्ही प्रज्ञाला नूर हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो. संध्याकाळी डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि वेदना सुरू झाल्या. मात्र त्यानंतर घडलं ते अनपेक्षित होतं.
बाळाच्या हृदयाचे ठोके कमी झाले. त्यामुळे सिजर करावं लागल्याचे डॉ. मासुमा मर्चंट यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांचा असिस्टंट डॉक्टर बाळाला घेऊन बाहेर आला. त्यावेळी बाळ आणि आई दोघेही मस्त आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही खूप खुश झालो. पण सकाळी या सगळ्या आनंदावर विरजण पडलं.
ताईला त्रास सुरू झाला होता. तिच्या लघवीच्या जागेतून खूप रक्त बाहेर पडत होतं. माझी आई, मामी आणि जिजू डॉक्टरांना बोलवा असं म्हणत होते. पण डॉक्टर फक्त whatsapp वर औषधं सांगत होते. त्यामुळे डॉक्टर वेळीच न आल्याने माझ्या बहिणीचा मृत्यू झाला, असं तुषार म्हणाला.
माझ्या बहिणीच्या मृत्यूला डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रज्ञाच्य कुटुंबाने केली आहे.
यानंतर आम्ही हॉस्पिटल प्रशासनाची बाजू जाणून घेतली. यावेळी अधिकृत मेडिकल ऑफिसर डॉ. रेहान अहमद यांनी मात्र कुटुंबाचे आरोप फेटाळून लावले.