बुलडाणा जिल्ह्यात काल 28 ऑगस्टला आणि आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेवारस नवजात बालक आढळल्याच्या धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हाभर विविध चर्चांना ऊत आला आहे. त्यामुळे आता मानवी मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. गेल्या चोवीस तासात बुलडान्यातील जळगाव जामोद व मलकापूर शहरातील परिसरात दोन बेवारस नवजात शिशू आढळल्याने नागरिकांमध्ये राग व्यक्त केला जात आहे.
काल सकाळी जळगाव जामोद शहरानजीक एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बेवारस परिस्थितीत फेकून दिलेलं स्त्री जातीचं नवजात अर्भक शेतात जाणाऱ्या महिलांना दिसून आलं होतं. पोलिसांनी तात्काळ या बाळाला प्रथम जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नंतर खामगाव सामान्य रुग्णालयात भरती केलं.
तर जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा नोंद करून या बाळाच्या आई वडिलांचा शोध सुरू केला आहे. या घटनेला 24 तास उलटत नाही. तोच आज सकाळी मलकापूर शहरातील एका बंद पडलेल्या कोविड सेन्टर च्या मागच्या निर्जन जागी ड्रेनेज टॅंक मध्ये मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या नागरिकांना रडण्याचा आवाज आल्याने, जाऊन पाहिलं असता एक पुरुष जातीचं नुकतंच जन्माला आलेलं बाळ बेवारस आढळून आलं. या बाळाला तात्काळ मलकापूर सामान्य रुग्णालयात भरती केलं असून मलकापूर शहर पुढील पोलीस तपास करीत आहे.