भारत-चीन तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता, काय घडतंय सीमेवर
भारत-चीन तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता, काय घडतंय सीमेवर India China border Dispute India Hits Back At China, Points To Provocative Behaviour In Ladakh Row;
सैन्य स्तरावर आणि राजकीय स्तरावर भारत-चीन संबंधांमध्ये अनेक वेळा बैठका झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणात उभय देशांच्या संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र, आता दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
चीनकडून सातत्याने भडकावणारी विधान येत असताना भारताने देखील आता चीनला सडेतोड उत्तर दिलं आहे.
चीन ने भारतावर टीका करताना
'भारत-चीन सीमेवरील तणावाचे मूळ कारण दिल्लीची 'फॉरवर्ड लाइन' असल्याचं म्हटलं होतं. ज्या अंतर्गत त्यांनी चीनच्या भूभागावर 'बेकायदेशीरपणे कब्जा' केला असल्याचा दावा केला होता.
चीनच्या या दाव्याला उत्तर देताना भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी बीजिंगला कडक शब्दात फटकारलं आहे. चीनच्या सैन्याने भारत-चीन सीमेवरील परिस्थिती बदलण्यासाठी एकतर्फी कृती आणि कारवाया केल्या आहेत, ज्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले की, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) सैन्य आणि उपकरणांचा प्रचंड प्रमाणात साठा आणला आहे. ज्यामुळे भारतला देखील असं करणं भाग पडलं आहे..
चीनचा दावा फेटाळला
चीनचा दावा फेटाळून लावत परराष्ट्र मंत्रालयाने आशा व्यक्त केली आहे की, बीजिंग लवकरच सीमा वाद सोडण्यासाठी ठोस पावले उचलेल आणि वास्तविक नियंत्रण रेषेवरील उर्वरित समस्या सोडवण्यासाठी ठरलेल्या तत्त्वांचे पालन करेल.
दरम्यान चीनची ही आक्रमकता केवळ भारतापुरतीच मर्यादित नाही, ती इतर देशांसोबतही आहे आणि इतर अनेक देश भारतीय प्रशांत क्षेत्रात त्याच्या वाढत्या हस्तक्षेपामुळं त्रस्त आहेत. एवढेच नाही तर, अमेरिकेनेही चीनच्या आक्रमकतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिकेची चिंता
दरम्यान, अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे पेंटागॉनचे माध्यमं सचिव जॉन किर्बी यांनी गुरुवारी बीजिंगवर याच मुद्द्यावरून टीका केली आहे.
ते म्हणाले,
"प्रशांत महासागरामध्ये चीन काय करत आहे? अनेक देशांसोबत तो कोणत्या प्रकारे वागत आहे. यावर आम्ही आमच्या मित्रांशी अनेक वेळा चर्चा केली आहे."
दरम्यान, गेल्या आठवड्यात अमेरिकेमध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अमेरिका या चार राष्ट्र प्रमुखांची शिखर बैठक झाली. या चार देशांच्या समूहाला क्वैडिलैटरल स्ट्रैटजिक डायलॉग म्हणजेच क्वाड म्हणतात.
निरीक्षकांचे मते, चीन क्वाड संघटनेच्या झालेल्या बैठकीनंतर रणनीती आखत आहे. त्यामुळं भारताने देखील सतर्क राहण्याची चिन्हं आहेत.
चीनची आक्रमकता
गेल्या आठवड्यातच चीनने उत्तराखंड राज्यात घुसखोरी केली होती आणि यावरूनच भारताची चिंता आणि चीनची आक्रमकता दिसून येते. दरम्यान, पीपल्स लिबरेशन आर्मी (चिनी आर्मी) च्या सैनिकांनी सीमा ओलांडून उत्तराखंडमध्ये प्रवेश केला. अनेक ठिकाणचे रस्ते आणि पूल पाडले. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, चिनी सैनिकांनी मागे फिरण्यापूर्वीही एक पूल तोडला.
इकॉनॉमिक टाइम्सनुसार, 55 घोडे आणि 100 पेक्षा जास्त सैनिक 5 किमी पेक्षा जास्त भागातील भारतीय हद्दीत घुसले होते.
मुद्दा फक्त घुसखोरीपुरता मर्यादित नाही. तर वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी कायमस्वरूपी थांबण्याची तयारी करत आहे.
दरम्यान, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) आपल्या भागात सैनिकांसाठी तात्पुरती घरे बांधली आहेत. ही घरे कंटेनरमध्ये बांधलेली आहेत, जी सहज आणि खूप कमी वेळेत तयार होतात. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत ते सामान्य लष्करी क्वार्टर म्हणून वापरले जाऊ शकतात.
चीनच्या आर्मी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने हे कंटेनर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून काराकोरम खिंडीत वहाब झिल्गा ते हॉट स्प्रिंग्स, पियू, चांग ला, ताशीगांग, मांझा आणि उत्तरेकडील चुरूप पर्यंत तयार केले आहेत.
'साऊथ चाइन मॉर्निंग' पोस्टनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी च्या वेस्टर्न थिएटर कमांडने रात्री सराव घेतला. याचा फायदा रात्रीच्या वेळीही सैन्य पुढे जाण्याच्या किंवा लढण्याच्या स्थितीसाठी होईल.
'साऊथ चाइन मॉर्निंग' पोस्टने दिलेल्या वृत्तामध्ये त्यांनी यांग यांग नावाच्या कमांडरच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात पीएलएने तेथे तैनात असलेल्या आपल्या सैनिकांना उंचीवर टिकून राहण्यासाठी, तसेच स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि रात्रीच्या लढाईचा सराव करण्यासाठी सांगितले आहे.