क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत वाढ

Update: 2021-11-05 11:55 GMT

पुणे :  क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील महत्वाचा पंच किरण गोसावी याच्या पोलीस कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी गोसावीला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान शिवाजी नगर न्यायालयाने आज त्याच्या कोठडीत वाढ केल्याने किरण गोसावीची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.

आर्यन खान प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीची आठ दिवसांची पोलीस कोठडी आज संपली होती. दरम्यान त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. गोसावीने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा देखील असल्याने फॉरेन्सिक रिपोर्टची गरज भासण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने गोसावीच्या कोठडीत वाढ केली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात दाखल करण्यात आलेल्या 4 गुन्ह्यांसह राज्यातील इतरही भागात गोसावीवर 5 गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यांत त्याच्यासोबत आणखी काही जण असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाला पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार 8 तारखेपर्यंत गोसावीच्या पोलीस कोठडीत

वाढ करण्यात आली आहे.

गोसावीवर पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणाने 2018 मध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी चिन्मयची तीन लाखांना फसवणूक केली होती. याबाबत पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Tags:    

Similar News