पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; 15 महिन्यांत इंधनाच्या किंमती 35 टक्क्यांनी वाढल्या
मुंबई दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने देशभरात तेलाचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचलेत. सरकारी तेल कंपन्या IOC, HPCL आणि BPCL यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 35 पैशांनी वाढ केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 108.29 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रतिलीटर 97.02 रुपये झाला आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर 114.14 रुपये आणि डिझेलचा दर 105.12 रुपये प्रतिलीटर आहे. तिकडे कोलकात्यात पेट्रोलसाठी प्रतिलीटर 108.78 रुपये मोजावे लागत आहेत तर डिझेलचा दर 100.14 रुपये प्रतिलीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 105.13 रुपये प्रतिलीटर आणि डिझेल 101.25 रुपये प्रतिलीटर आहे.
गेल्या 15 महिन्यांत देशभरात इंधनाच्या किंमती 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे देशात जास्त मायलेज देणाऱ्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी श्रेणीतील गाड्यांची मागणी वाढू शकते, असे HSBC ग्लोबल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. जे दिवसभरासाठी लागू असतात.