ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ ; 500 हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार लाभ
मुंबई // थंडी, उन, वारा, पाऊस या आस्मानी संकटात तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश काही दिवसांपुर्वी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिले. महावितरण कंपनीने संचालक मंडळाची मान्यता घेऊन ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयाची वाढ केली. याचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे. त्यामुळे व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानलेत.
३ हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरण कंपनीकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रान्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमाह ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण कंपनीचे अधिकारी आणि ग्राम विद्युत व्यवस्थापक यांची मुंबई येथे संयुक्त बैठक घेवून मानधनात वाढ करण्याचे निर्देश महावितरण कंपनीला दिले. त्यानंतर महावितरण कंपनीने संचालक मंडळाची मान्यता घेऊन विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवार (ता.२६) पासून ही वाढ लागू झाली आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून म.रा.वी.मं. सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयामध्ये महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली व मानधनात वाढ केली.