आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारपट्टीच्या काही भागात गुलाब चक्रीवादळाचा इशारा
मुंबई : भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या काही भागात 'गुलाब' (Cyclone Gulab) चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राचं शनिवारी 'गुलाब' चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाल्याचे म्हटले आहे. आयएमडीच्या वादळ संकेत विभागानं चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता व्यक्त केली आहे त्यानंतर हे वादळ रविवारी संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याचा अंदाज आयएमडीच्या वादळ संकेत विभागानं व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातही याचा परिणाम जाणवू शकतो.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांमध्ये 7 किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे.त्यामुळे 'गुलाब' चक्रीवादळ तीव्र झाले असून उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशासाठी वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.