वाझे माफीचा साक्षीदार कोणाचा? CBI चा की भाजपचा, सामनातून शिवसेनेचा भाजपला सवाल
100 कोटींच्या वसूली प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार असल्याची विनंती न्यायालयाने मान्य केली. त्यावरून शिवसेनेचे मुखपत्र सामनातून सचिन वाझे याच्या माफीचा साक्षीदार होण्यावर टीका करण्यात आली आहे.;
शंभर कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणात सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. तर न्यायालयाने सचिन वाझे याचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज मंजूर केला. मात्र यावरून शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, शंभर कोटींच्या वसूली प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेला पोलिस अधिकारी सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार आहे म्हणे. परंतू सचिन वाझे प्रकरणात भाजपने केलेला शिमगा विसरता येणार नाही, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे. तसेच वाझे म्हणजे वसुली, भ्रष्टाचार, असे नामाभिधान बनले आहे. तसेच वाझे हा भ्रष्टाचार, वसूली आणि खून प्रकरणातील आरोपी आहे. एवढंच नाही तर परमबीर सिंह आणि सचिन वाझे या जोडगोळीने खादी वर्दीचा गैरवापर केला आहे. त्यामुळे देशभरातील पोलिसांची मान शरमेने खाली गेली असल्याचे सामनात म्हटले आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्यासमोर स्फोटके ठेऊन वाझेनी सनसनाटी निर्माण केली होती. त्यानंतर त्या गाडीचा मालक आणि मित्र मनसुख हिरेन याची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करून सरळ सरळ अभय दिले जात आहे, असा आरोप सामनातून केला आहे.
सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, परमबीर सिंह यांनी आरोप केल्यानंतर राज्याचे तात्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. तर सध्या अनिल देशमुख तुरूंगात आहेत. मात्र अनिल देशमुखांवर वसूलीचे आरोप करण्यात आल्यानंतरही त्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे आढळून आले नाहीत. एवढंच नाही तर सीबीआय आणि ईडीने दोनशे वेळा देशमुख यांच्या घरावर धाडी टाकल्या आहेत. तर करून सवरून परमबीर सिंह मोकळे आहेत. त्यांना आणि वाझेला अभय मिळत आहे. याला कायद्याचे राज्य म्हणायचे का? असा सवाल सामनातून उपस्थित केला आहे.
सामनात पुढे म्हटले आहे की, अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेऊन वाझेने दहशतवादी कृत्य केले आहे. तसेच मनसुख हिरेन याची हत्या केली आहे. मात्र तरीही सीबीआय वाझेला माफीचा साक्षादार बनवत आहे. एवढंच नाही तर वाझेला माफीचा साक्षीदार करणे म्हणजे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्यात येत असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
वाझे साक्षीदार कोणाचा?
विविध पक्षांतून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांचाही सामनाच्या अग्रलेखात समाचार घेण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जो खटला खोटेपणावर आधारीत आहे. त्या खटल्यात खोटा गुन्हेगार माफीचा साक्षीदार बनून काय सांगणार? त्यामुळे वाझे हा सीबीआयचा माफीचा साक्षीदार आहे की भाजपचा असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
भाजपवासी नेत्यांचा घेतला समाचार
पुढे म्हटले आहे की, प्रश्न वाझेचा नसून नैतिकतेचा आहे. मात्र त्यामध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक माफीचे साक्षीदार बनून भाजपवासी झाले असल्याची टीकाही यावेळी सामनातून करण्यात आली. पुढे असे म्हटले आहे की, भाजपमध्ये प्रवेश केल्याने ईडीचा त्रास वाचला असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले होते. तसेच नारायण राणे यांनी बोगस कंपन्यांचे आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर येताच त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे बँका बुडवणारे, काळा पैसा पांढरा करणारे अनेक पांढरपेशे भाजपवासी झाल्याची टीका सामनातून केली आहे. तर हार्दिक पटेल कालपर्यंत भाजपसाठी देशद्रोही होता. मात्र आता तो भाजपवासी झाल्याने तो देशभक्तीच्या ताम्रपटाचा मानकरी झाल्याचा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे.
राज्यात मंगळसुत्र चोरीपासून ते वाल्या शुध्द शुचिर्भुत होण्यापर्यंत माफीचे साक्षीदार बनले आहे. त्यामुळे अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणारा आणि मनसुख हिरेन याची हत्या करणारा आरोपी आज माफीचा साक्षीदार आणि उद्या भाजपवासी झाला तर आश्चर्य वाटायला नको, असे मत सामनातून व्यक्त केले आहे.