एका वर्षात 23 जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला; चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर घणाघात
अहमदनगर : पारधी समाजातील महिला सुमन काळे यांचा चोरीचे सोने सराफांना विकते या संशयावरून १४ मे २००७ रोजी अटक केली होती. दरम्यान, अटकेनंतर तीन दिवसांनी सुमन काळे यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) देण्यात आला होता. सीआयडीने तपास करून तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक देविदास सोनवणे, कोतवालीचे निरीक्षक तुकाराम वहिले, पोलीस कर्मचारी शिवाजी सुद्रिक, दीपक हराळ, सुनील चव्हाण, डाॅ. एस. एस. दीपक यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. पुढे २००८ मध्ये सुमन यांचा मुलगा साहेबा गजजान काळे (रा. बुरुडगाव रोड) यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आरोपींविरोधात खुनाचे कलम लावण्याची मागणी केली होती.
विशेष म्हणजे सुमन काळे यांनी पतीसोबत झालेल्या भांडणातून विष घेऊन आत्महत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे होते, तर त्यांचा मृत्यू कोठडीत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे झाला, असे काळे हिच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते. पुढे व्हिसेरा अहवालात त्यांच्या शरीरात विष न आढळता जखमांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आता या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली आहे .
संबंधित महिलेवर खोटे आरोप करत त्यांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांना कोठडीत मारहाण करण्यात आली. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात हे पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अगदी जवळ असताना या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती न करता खासगी रुग्णालयात का नेण्यात आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान त्यावेळी डाॅ. दीपक यांनी या गुन्ह्यातून आपल्याला वगळावे, अशी याचिका खंडपीठात दाखल केली होती; परंतु ती फेटाळण्यात आली होती.
मृत्यूप्रकरणी आरोपींविरोधात वाढीव खुनाचे कलम लावण्यासह काळे हिच्या नातेवाइकांना पाच लाखांची भरपाई द्या व हा खटला सहा महिन्यांत निकाली काढा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेब्रुवारी महिन्यात दिले होते.
दरम्यान चित्रा वाघ यांनी बोलताना म्हटले की, मागील एका वर्षात तब्बल 23 जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या या सरकारने रक्षकांचा भक्षक बनवले आहे का? एवढ्या वर्षांनंतरही सुमन काळे यांना न्याय मिळाला नसल्याने हे खरेच आहे की काय असे वाटू लागले आहे. मुख्यमंत्र्यांना याची उत्तरं द्यावीच लागतील असं वाघ यांनी म्हटले आहे.