जोगेश्वरी आखाडा येथील बहीण- भावाच्या रक्षाबंधनाने वेधले सर्वांचेच लक्ष
दोन ते अडीच रुपयांना मिळणारी साडी रक्षाबंधनानिमित्ताने बहिणीला भेट दिल्याच्या आठवणी सांगत जोगेश्वरी आखाडा येथील शंभरी गाठलेल्या बहीण- भावाने रक्षाबंधन साजरे केले.
आज सर्वत्र रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना राहुरी तालुक्यातील एका बहीण- भावाच्या रक्षाबंधनाने सर्वांचेच लक्ष वेधले. राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील वारकरी संप्रदायातील जेष्ठ व्यक्तिमत्व, समाजभूषण पुरस्काराने सन्मानित 100 वर्षीय ह भ प नारायण डौले यांना त्यांच्या 96 वर्षीय भगिनी पार्वतीबाई कृष्णाजी भुजाडी यांनी राखी बांधत हा सण साजरा केला.
मागील 90 वर्षांपासून सुरू असलेल्या या दोघा बहीण- भावाच्या रक्षाबंधनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावेळी हभप नारायण डौले यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अगदी दोन ते अडीच रुपयांना मिळणारी साडी त्यांनी आपल्या बहिणीला भेट देण्यापासून ते लग्न झाल्यानंतर पायी भावाला राखी बांधण्यासाठी बहिणीची धडपड याबद्दलच्या आठवणींना या भावा बहिणींनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना उजाळा दिला.
आता सर्व संसाधने उपलब्ध असताना देखील भाऊ बहिणीच्या अतूट नात्याची साक्ष देणाऱ्या या सणाला भाऊ बहीण भेटत देखील नाहीत, केवळ मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा संदेश आणि कृत्रिम राखी पाठवली जात असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
एकत्र कुटुंब पद्धती, नातेवाईकांचा गोतावळा, एकत्र येऊन सण उत्सव साजरे करण्याची पद्धत कालबाह्य होत असल्याने दुःख वाटत असल्याचे पार्वतीबाई भुजाडी यांनी म्हटले आहे.
यावेळी पार्वतीबाई यांनी राखी नारायण डौले यांना राखी बांधत त्यांचे आशीर्वाद घेतले.आणि आपल्या भावाला आरोग्यदायी जीवन मिळो अशी इच्छा परमेश्वराकडे व्यक्त केली.