तिजोरी पळवणाऱ्या चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, तिजोरी केली हस्तगत

पैशासह तिजोरी चोरी केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील विटा येथे घडली होती. मात्र पोलिसांनी काही तासातच चोराच्या मुसक्या आवळल्या.

Update: 2022-10-16 04:03 GMT

सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस स्टेशन हद्दीत ग्रोसरी सेंटर मध्ये चोरी झाली होती. यामध्ये चोराने पैशासह तिजोरीची चोरी केली होती. यामध्ये तब्बल 7 लाख 80 हजार रुपये होते. या गुन्ह्याची फिर्याद दहा तारखेला विटा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यामुळे भरवस्तीत झालेल्या चोरीचा छडा लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

या गुन्ह्यात तपास अधिकारी असलेले पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी तापासाची सूत्रे गतिमान करत घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. त्याआधारे पोलिसांनी काही तासातच या जबरी चोरीचा छडा लावला.

ही चोरी दुकानातील कामगार असलेल्या मनिष देवदास झेंडे आणि त्याचा साथीदार पवन मधुकर झेंडे यांनी केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर भादंवि कलम 457, 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच या गुन्ह्यात चोरी करण्यात आलेली 7 लाख ऐंशी हजार रुपयांसह दहा हजार रुपये किमतीची तिजोरी पोलिसांनी हस्तगत केली.

पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कमद, पोलिस निरीक्षक संतोष डोके, पोलिस उप-निरीक्षकजे. जाधव यांच्यासह विटा पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यामुळे चोरट्यांमध्ये धाक निर्माण झाला आहे.

Tags:    

Similar News