क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील खंडणीच्या आरोपाबाबत मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे!

Update: 2021-11-05 03:41 GMT

मुंबई  : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील खंडणीच्या आरोपाबाबत मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे वृत्त आहे, यात किरण गोसावी याच्याबाबत महत्त्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले असून गुन्हा दाखल होताच त्याला पुणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. याच प्रकरणात अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचाही जबाब नोंदवून घेतला जाणार असून तिला समन्स पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आलं होतं , या दरम्यान आर्यनवर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये, त्याच्यावर अटकेची कारवाई होऊ नये, यासाठी बऱ्याच घडामोडी घडल्याचे समोर येत आहे. २ तारखेच्या मध्यरात्रीनंतर घडलेल्या घडामोडींचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेत. त्यात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी, क्रूझ ड्रग्ज पार्टीतील पंच साक्षीदार किरण गोसावी, त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल तसेच ददलानी व गोसावी यांच्यातील मध्यस्थ सॅम डिसूझा यांच्याबाबत महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचे वृत्त आहे.

लोअर परळच्या बिग बाझारजवळील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यात पूजा ददलानी यांची मर्सिडीज कार, गोसावीची इनोव्हा आणि सॅम डिसूझाची इनोव्हा दिसत आहेत. मर्सिडीजमधून एक महिला उतरली आणि गोसावीशी काहीतरी बोलून काही वेळातच निघून गेल्याचे त्यात दिसत आहे. ही महिला म्हणजे पूजा ददलानी होती की अन्य कोणी, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. गंभीर बाब म्हणजे गोसावीच्या इनोव्हा कारवर पोलीस अशी पाटी दिसत आहे. खंडणी वसुली तसेच पोलीस पाटीचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे, त्याचवेळी पूजा ददलानीचे या प्रकरणात थेट नाव येत असल्याने जबाब नोंदवण्यासाठी तिला समन्स बजावले जाण्याचीही शक्यता आहे.

Tags:    

Similar News