कोरोना काळात आणि राज्यात कायद्यानुसार डान्सबार वर बंदी असतानाही मुंबईत आणि बोरिवली ते काशिमीरा भागात डान्सबार पोलिसांना हप्ते देऊन सर्सास सुरु असल्याचा मुद्दा विधान परिषदेत आज उपस्थित झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आजच कडक कारवाईचे आदेश देऊन मुंबईसह ठाण्यामध्ये सुरु असणाऱ्या हुक्का पार्लर आणि बारवर धडक कारवाया करु असं गृहमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी रात्रभर हे डान्सबार सुरु असतात. या बारमुळे त्या परिसरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जात आहे. या डान्स बार चालकांना प्रश्न विचारल्यास पोलीस अधिकारी हफ्ता घेत असल्याचे त्यांनी सांगितले असल्याचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर निरंजन डावखरे आणि रामदास कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काश्निरा ते बोरिवलीमध्ये अनधिकृतरित्या डान्स बार रात्रभर सुरु असल्याचे सांगितले.
तसेच त्या परिसरातील पोलीस अधिकाऱ्यांना या बारकडून मोठे हफ्ते येत असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले. या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करुन निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली. यावेळी भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी घोडबंदर येथील हुक्का पार्लरचा प्रश्न मांडला आहे. या हुक्का पार्लरच्या मागे गृहमंत्र्यांना हफ्ता झाला असल्याचे हुक्का पार्लरच्या मालकाने सांगितल्याचे निरंजन डावखरे यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या उत्तराला प्रत्त्युत्तर देताना संबंधित हुक्का पार्लर मालकांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच डान्सबारकडून हफ्ता घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. पुढील २ दिवसांच्या आत ह्या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल असे आश्वासनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. घोडबंदर रोडवरील हुक्का पार्लरच्या मालकावर २४ तासाच्या आत कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आश्वासन दिले आहे.