कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्लाज्मा थेरपीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने हा निर्णय घेतला आहे.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, एम्स दिल्ली आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर कोरोना उपचारासंबंधी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात प्लाज्मा थेरपी कोरोना उपचारपद्धतीत परिणामकारक असल्याचं सांगण्यात आलं होतं.
मात्र, अभ्यासातून प्लाझ्मा थेरपी परिमाणकारक नसल्याचं समोर आलं आहे. आयसीएमआर आणि टास्क फोर्सच्या बैठकीत प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
आत्तापर्यंत कोरोनासंबंधी उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी होती. केवळ सुरुवातीच्या टप्यात म्हणजेच लक्षणं दिसल्यानंतर पहिल्या सात दिवसांच्या आत प्लाज्मा थेरपीचा वापर केला जाऊ शकत होता. दरम्यान टास्क फोर्सने आता प्लाज्मा थेरपीला उपचारांमधून वगळलं आहे.
का वगळले प्लाज्मा थेरेपीला उपचारामधून?
सुरुवातीला कोरोना उपचारासाठी प्लाज्मा हे वरदान ठरलं होतं आणि असं काही तज्ज्ञांनी मानलं देखील होतं.
कारण यापूर्वी आलेल्या सार्स आणि इबोला सारख्या रोगांमध्ये प्लाज्मा ने चांगली कामगिरी बजावली होती.
त्यामुळे अनेक जणांचे प्राण वाचले होते आणि त्याच माहितीच्या आधारे प्लाज्मा थेरेपी सुरू करण्यात आली होती.
परंतु गेली काही महिने यावर संशोधन झाले आणि कोरोना बाधित रुग्णाला ही प्लाज्मा थेरेपी दिली जाते. तेव्हा तो लवकर बरा होतोच असं नाही, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढलेला आहे.
कोरोनाच्या अँटिबॉडीज या रुग्णाच्या लक्षणाप्रमाणे वेगवेगळ्या असू शकतात. जर रुग्ण गंभीर पद्धतीने आजारी असेल आणि तो बरा झाल्यानंतर जर त्याच्या प्लाज्मा वापरला तर थोड्या फार प्रमाणात त्याचा उपयोग होऊ शकतो. परंतु जर रुग्ण कोरोना बाधित असेल आणि त्यामध्ये कोणतेही लक्षण नसतील तर त्याच्या अँटिबॉडीज कमकुवत असू शकतात. अशा कमकुवत व्यक्तीवर ही उपचार पद्धती घातक ठरू शकते. म्हणून ही पद्धती बंद करण्यात आल्याचं डॉ. अविनाश बोंडवे यांनी सांगितलं आहे.