शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. कृषी विभागाचे IAS अधिकारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यामधून अटक करण्यात आली आहे. त्यांना आता कोर्टात हजर केले आहे. पुणे पोलिसांच्या टीमने खोडवेकर यांना आज शनिवारी ठाण्यातून अटक केली. खोडवेकर हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागात उपसचिव पदावर कार्यरत होते. या शिक्षक भरती परीक्षेतील घोटाळ्यात ते देखील सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकऱणातील ही आणखी एक मोठी कारवाई ठरली आहे, त्यामुळे आता यामागे कुणाचा हात होता, याची माहिती देखील आता समोर येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
याप्रकरणात आतापर्यंत राज्य परीक्षा परिषदेचे तेव्हाचे आयुक्त सुखदेव डेरे आणि परीक्षा घेणाऱ्या G.A. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे तेव्हाचे व्यवस्थापक सहभागी होते अशी माहिती समोर आली आहे. या दोन्ही आरोपांना पोलिसांनी ३ दिवसांपूर्वीच अटक केली होती. या परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात लाच घेण्यात आल्याचा आरोप या सर्वांवर आहे. याप्रकरणी याआधी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर आणि संजय सानप यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकऱणात जवळपास ८ हजार शिक्षकांना पैसे घेऊन पात्र ठरवण्यात आल्याचीही माहिती समोर येते आहे.