रायगड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळावी व जनतेचा प्रवास सुखकर व्हावा या मागणीसाठी समृद्ध कोकण संघटनेना आणि कोकण महामार्ग समन्वय समिती यांच्या वतीने सर्वपक्षीय नेते, नागरिक यांच्या सहभागाने मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारची महामार्गाच्या कामाबाबतची निष्क्रियता व नियोजन शून्य कारभार यावर संताप व्यक्त केला.
यावेळी समृद्ध कोकण महामार्ग झालाच पाहिजे या घोषणांनी महामार्ग दणाणून सोडला. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पळस्पे ते पत्रादेवीपर्यंत एकूण 471 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा समावेश आहे. त्यापैकी पळस्पे ते इंदापूर (८४ किमी) हा पहिला टप्पा आहे. मागील सहा ते सात वर्षांपासून सुरू झालेल्या या पहिल्या टप्प्याचे काम आजतागायत पूर्ण झालेलं नाही. तर इंदापूर ते कशेडी (77 किमी) हा चौपदरीकरणाचा पुढील टप्पा आहे. या टप्प्याच्या रुंदीकरणाचे काम मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरू झाले आहे. हे दोन्ही टप्पे रायगड जिल्ह्यातून जातात. मृत्यूचा सापळा म्ह्णून ओळखला जाणारा हा महामार्ग केव्हा सुधारणार याकडे साऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. यावेळी कोकण वासीयांनी महामार्गाच्या दुरावस्थे विरोधात जोरदार आवाज उठविला. महामार्गावर आजवर अपघातात निष्पाप जीवांचा बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.