बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या हिजाबच्या वादातून नाही, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटक राज्यात हिजाबचा मुद्दा तापला आहे. त्यातच शिमोगा जिल्ह्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निघृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. मात्र ही हत्या हिजाबच्या वादातून नसल्याचे स्पष्टीकरण कर्नाटकचे गृहमंत्री आरागा जनेंद्र यांनी दिले आहे.
कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात हिजाब वादातून हर्षा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली असल्याचा आरोप सोशल मीडियातून व्यक्त केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर कर्नाटकचे गृहमंत्री आरागा जनेंद्र यांनी हत्या झालेल्या युवकाच्या कुटूंबियांची भेट घेतली. हर्षाच्या कुटूंबियांच्या भेटीनंतर गृहमंत्री आरागा जनेंद्र यांनी हर्षा याची हत्या हिजाबच्या वादातून झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा याची हत्या झाल्यानंतर सोशल मीडियावर धार्मिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न आहे. तर हर्षा याच्या हत्येचा हिजाब वादाशी संबंध जोडण्यात येत आहे. मात्र कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे हर्षा याची हत्या हिजाब वादातून झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर हर्षा याच्या हत्येचा तपास करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली.
कर्नाटक राज्यातील उडूपी येथील एका महाविद्यालयात हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आलेल्या वादाचे लोण कर्नाटकसह देशभर पसरले. त्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. तर हिजाबबाबतची सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयात सुरू आहे. दरम्यान कर्नाटक राज्यातील शिमोगा आणि उडूपी जिल्ह्यात समाजकंठकांकडून दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्यानंतर शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्याची नामुष्की सरकारवर आली होती. हिजाब वादावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने हिजाब वाद काही प्रमाणात निवळला होता.
हिजाब वाद निवळत असतानाच शिमोगा जिल्ह्यात हर्षा नावाच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याने या हत्येचा संबंध हिजाबशी जोडण्यात येत होता. मात्र कर्नाटकचे गृहमंत्री आरागा जनेंद्र यांनी हर्षाची हत्या ही हिजाब वादातून झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
तसेच यावेळी जिनेंद्र म्हणाले की, चार ते पाच जणांच्या जमावाने 26 वर्षीय हर्षा याची हत्या केली. यामागे कोणते संघटन आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून शहरातील शाळा आणि महाविद्यालये दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत.