लॉकडाऊनबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मोठे विधान
राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन लागणार का, अशी चर्चा सुरू असताना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे.;
देशात सध्या दररोज दोन लाखांच्या वर रुग्ण वाढत आहेत. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. पण आता देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात येईल का, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी लॉकडाऊन संदर्भात वक्तव्य केले आहे. देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या आजारावर औषध नाहीये. पण आता घाईघाईने लॉकडाऊन करण्याची स्थिती नाहीये. गेल्यावर्षी सरकारने जे लॉकडाऊन केले होते ते सर्व तयारी करण्यासाठी केले होते, आता अजून तशी वेळ आलेली नाही. पण केंद्र सरकार सर्व राज्य सरकारांशी चर्चा करत आहे. सर्व परिस्थितीचा आणि सगळ्यांची मतं विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राबाबत अमित शाह यांचा सवाल
देशात कोरोना रुग्ण वाढत आहेत, याला काही राज्यांमधील निवडणुकाही जबाबदार असल्याचा आरोप होतोय. यासंदर्भातल्या प्रश्नावर उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या 60 हजार रुग्ण आढळत आहेत. तर प.बंगालमध्ये 4 हजार रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात निव़डणुका नसूनही तिथे रुग्ण वाढत आहे, अशी अनेक राज्यसुद्धा आहेत. मला महाराष्ट्र आणि प.बंगाल यांची काळजी आहे, पण कोरोना रुग्ण वाढीला निवडणुका जबाबदार असल्याचे आपल्याला वाटत नाही, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.