कलम 370 रद्द झाल्यानंतर अमित शाह जम्मू-काश्मीरमध्ये, शहीद जवानांच्या कुटुंबाची घेतली भेट

Update: 2021-10-23 08:40 GMT

जम्मू कश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शनिवारी 23 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबाची भेट घेतली.

ते तीन दिवसांच्या जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. शहा पहिल्या दिवशी श्रीनगरमधील सुरक्षा-संबंधित प्रकल्पांचा आढावा घेणार आहे. कारण काश्‍मीरमधील दहशतवाद्यांनी तेथील नागरिकांना लक्ष्य बनवलं आहे. त्यामुळं आज पहिल्यांदा ते तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

5 ऑगस्ट 2019 ला जम्मू -काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले होते. त्यानंतर शहा यांचा हा पहिलाच जम्मू - काश्मीर दौरा आहे. यापूर्वी शाह यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 2019 मध्ये राज्याचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा घेतला तसेच केंद्रीय योजनांच्या प्रगतीचा आढावा देखील घेतला होता.

"शहा आज शनिवारी श्रीनगरमधील सुरक्षा आणि विकास प्रकल्पांचा आढावा घेतील आणि रविवारी जम्मूमध्ये जाहीर सभा घेतील."

अमित शहांसाठी कडेकोट सुरक्षा...

गृहमंत्र्यांच्या केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यापूर्वी, श्रीनगरमध्ये अनेक वाहतूक निर्बंध लादण्यात आले आहेत, ज्यात दुचाकी चालवणाऱ्यांना कडक सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागत आहे. या व्यतिरिक्त, सुरक्षेच्या कारणास्तव एकूण 50 केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) पथके देखील तैनात करण्यात आली आहेत.

नुकतंच, जम्मू आणि काश्मीरमध्ये गैर -स्थानिकी लोकांच्या हत्येनंतर, केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 700 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. काहींना (पीएसए) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, जम्मू -काश्मीरमधील एकूण 26 कैद्यांना सार्वजनिक सुरक्षा कायदा 1978 अंतर्गत आग्रा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे.

शह आज सकाळी 11 वाजता श्रीनगरला पोहोचले, असून ते इंटेलिजेंस ब्युरो आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे प्रमुख, जम्मू-काश्मीर पोलिसांचे उच्च अधिकारी आणि इतर उच्च अधिकारी यांच्यासोबत बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर ते इतर अनेक राजकीय कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं देखील समजतंय.

यासोबतच, अमित शहा आज जम्मू-काश्मीर युथ क्लबच्या लोकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. याशिवाय संध्याकाळी श्रीनगर-शारजाह आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू केली जाणार आहे. श्रीनगर ते शारजाह दरम्यान हे थेट विमान असेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा सुरक्षा दलातील शहीद आणि अलीकडे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहतील. ते "ते नुकतंच दहशतवाद्यांचा बळी ठरलेले शिक्षक आणि मुस्लिम नागरिक माखन लाल बिंदू यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची शक्यता आहे."

शहा दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरालाही भेट देतील, जिथे फेब्रुवारी 2019 मध्ये दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. गृहमंत्री अमित शहा तिथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहतील.

अमित शहा केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यादरम्यान जम्मू -काश्मीर प्रशासनासोबत बैठक घेतील आणि विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतील. त्यानंतर, रविवारी शहा जम्मूला जातील, तिथे ते आयआयटीच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील, त्यानंतर एक रॅली होईल. तसेच, श्रीनगरला जाण्यापूर्वी ते तेथील काश्मिरी पंडितांच्या गटाला भेटण्याचीही शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. .

दरम्यान, दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी, सोमवारी अमित शाह SKICC येथे नागरी समाजाच्या शिष्टमंडळाचीही भेट घेणार आहेत. आणि त्यानंतर ते नवी दिल्लीला परततील.

एकूणच, शहा यांच्या पहिल्या काश्मीर खोऱ्याच्या दौऱ्यापूर्वी संपूर्ण काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणांचे उच्च अधिकारी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित होते. 16 कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा आढावा बैठक झाली. ज्यात पोलीस, निमलष्करी दल आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह देखील या बैठकीला उपस्थित होते.

Tags:    

Similar News