मराठी सिनेसृष्टीतील गुन्हेगारीमुळे दबाव, निर्माते दिग्दर्शकांची गृहमंत्र्यांकडे तक्रार

Update: 2021-07-09 02:29 GMT

मराठी सिने क्षेत्रात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे आपल्यावर दबाव वाढला आहे, अशी व्यथा निर्माते, दिग्दर्शकांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मांडली. ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येनंतर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ व निर्माता यांना चित्रपट युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांनी काय कारवाई केली पाहिजे याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी मराठी चित्रपट सृष्टीत गुन्हेगारीमुळे वाढलेला दबाव आणि समस्या तसेच त्यांच्या मागण्या गृहमंत्र्यसमोर मांडल्या. यावर मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

चित्रपट सृष्टीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे सांगत गृहमंत्र्यांनी याआधीच्या सर्व गुन्ह्यांमधील दोषींवर कठोर कारवाई करा त्यामुळे इतरांना वचक बसेल, असे सांगितले. गरज पडल्यास विशेष चौकशी समिती नेमण्याचेही यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितलपे.

कामगारांच्या वेतनाबाबत गृहमंत्र्यांच्या सूचना

कामगार विभागाने या क्षेत्रातील कामगारांना थेट बँकामार्फत वेतन अदा करण्यासाठी आवश्यक ती धोरणात्मक कार्यवाही करावी. कामगारांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या मध्ये जागरुकता आणण्यासाठी नवीन धोरण तयार करावे अशा सूचनाही गृहमंत्र्यांनी कामगार आयुक्तांना दिल्या. तसेच गृहविभागाच्या नियंत्रणाखाली सर्व संबंधित विभागाची एक स्वतंत्र समिती कायमस्वरूपी गठीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीला अभिनेते आदेश बांदेकर, पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, कलादिग्दर्शक नितीन देसाई, मेघराज भोसले, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

Tags:    

Similar News