मुस्लिम बाईने हिंदू बाईला का मदत करावी ?
हिंदू मुस्लिम द्वेषाच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. या प्रदूषित वातावरणात हिंदू मुस्लिम यांच्यातील जिव्हाळ्याची आठवण लखन शोभा बाळकृष्ण यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. पण खरंच ही पोस्ट वाचणारा व्यक्ती हिंदू मुस्लिम द्वेष करूच शकणार नाही.;
गोष्ट सांगायची नव्हती पण महाराष्ट्रात जे सुरुय ते आणि इनबॉक्समध्ये आलेला हा मॅसेज. त्यामुळे बोलतोय..
गोष्ट घरातली आहे आणि ती पण माझ्या माय-बहिण आणि माझ्या लेकीची आहे.
एका महिन्यांपूर्वी माझी पुतणी घराच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडली. दीड वर्षाची आमची आरोही. ती पडली सिमेंटच्या तुळशी रुंदावनावर. घरी वहिनी आणि तीच होती. भाऊ कामानिमित्त बाहेर गावी होता. पडल्यानंतर रक्तबंबाळ झालेली आरोही, डोक्यावर पडली होती. खूप मोठी जखम झाली होती. गेल्यात जमा होती आमची आरोही.
कसं तरी भावाने आमच्या चुलत भावाला कॉल करून तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्याची व्यवस्था केली. जवळच्या सरकारी दवाखान्यात तिला घेऊन गेले. तिथे गेल्यावर कळलं जखम मोठी आहे. इथे काही होऊ शकत नाही. (बऱ्याच सरकारी दावखान्यांची अवस्था अशीच आहे.)
तेव्हा खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सरकारी 108 नंबरची सरकारी ऍम्ब्युलन्स तयार नव्हती. वहिनीकडे मोजके पैसे.
वहिनींची तारांबळ उडालेली आणि पोरगी बेशुद्ध अवस्थेत होती. सरकारी दवाखान्यात नोकरीला असणारी एक महिला हे सगळं बघत होती. ती वहिनींकडे आली आणि त्यांना "बोलली काहीच चिंता करू नका, सगळं ठीक होईल" आणि तेव्हढ्यात त्या बाईने आपल्या जवळची 30 हजारांची नोटांची गड्डी काढली आणि वहिनींच्या हातात दिली आणि म्हटली की "मला परत दे अगर नको देऊस, तू जा लवकर, मी सरकारी ऍम्ब्युलन्सला मॅनेज करते. ते देतील तुला चांगल्या हॉस्पिटलमध्ये सोडून."
वहिनी त्याबाईकडे आश्चर्याने बघत होत्या. कारण ओळख नाही काही नाही, ही बाई इतकी रक्कम परत दे अथवा न देच्या बोली आपल्याला देतेय. तेव्हा ते आश्चर्य वाटणं साहजिक आहे. तेव्हा ऍम्ब्युलन्समध्ये बसून दहा मिनिटांमध्ये आमची आरोही खाजगी हॉस्पिटलमध्ये पोहचली. सगळे उपचार झाले. सात टाके देऊन झाले. नंतर आरोही शुद्धीवर आली.आता आरोही ठणठणीत आहे.
ती पैसे देणारी बाई मुस्लिम होती. ती ओळखीची नव्हती आणि दुसरी ती आमच्या घरच्यांच्या धर्माची नव्हती. तिचा धर्मही मुस्लिम. तिने एका हिंदू बाईला का मदत करावी? खरं तर हे सहजपणे कळणारं नाहीये कुणालाच.
पृथ्वीवर सगळे धर्म मानवनिर्मित आहेत. माणूस जन्माला आला आणि नंतर माणसाने धर्म जन्माला घातला. पण एक धर्म जन्मजातच अस्तित्वात होता तो म्हणजे 'माणुसकी'. बस्स हीच माणूसकी होती त्या मुस्लिम बाईकडे. तिने ती जपली. हिंदू पोरीला तिने मदत केली. बाकी मला जे सांगायच आहे ते तुम्हा सगळ्यांपर्यत पोहचलं असेलच.
अजून एक माझ्या आई-वडीलांचं रक्त जरी माझ्या अंगात असलं तरी बालपणी माय मजुरी करायला शेतात जायची. तेव्हा शेजारी राहणाऱ्या मस्लिम कुटुंबानेही माझं रिकामं पोट भरलय. त्या भाकरीनेही माणुसकी शिकवलीय आणि तिलाच जागतोय. सगळेच वाईट नसतात.. बस्स इतकंच..