महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्यावेळी मला हिंदी भाषा जेव्हा कानावर ऐकायला येते तेव्हा त्रास होतो. माझा कुठल्याही भाषेला विरोध नाही पण; हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही. मराठी, तमिळ, तेलगु, गुजराती,कन्नड या भाषेप्रमाणेच ती एक भाषा आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गुजरात या राज्याविषयी विशेषतः भाषेविषयी प्रेमाची भावना ठेवतात तर आपण मराठी माणसांनी मागे का रहायचं आपणही आपल्या राज्याचा आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे त्यामूळे राज्यातील सर्वच शाळांमध्ये इयत्ता दहावी पर्यंत मराठी भाषेला प्राधान्य देण्याची सक्ती करावी अशा पध्दतीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलताना केली.
काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी हाच मुद्दा उपस्थित केला होता, मात्र त्यावेळी त्यांना प्रचंड विरोध झाला, तसं या विरोधाला प्रतिउत्तर देत राज ठाकरे यांनी त्यावेळी गुजरात हायकोर्टाचे पुरावे संदर्भ म्हणून दिले होते. हिंदी भाषेची राष्ट्रभाषा म्हणून कधीही निवड करण्यात आलेली नाही. फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाची ती एक भाषा आहे. आजवर कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला गेलेला नाही. आपल्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाल्यामुळे हिंदी भाषेचा आपल्या बोली भाषेवर प्रभाव पडलेला आहे. परंतु महाराष्ट्रात राहून मराठी लोक हिंदी का बोलतात ? असा सवाल राज ठाकरेंनी केला.