Gautam Adani | कारवाई कराचं, Hindenburg Research चं अदानींना आव्हान
भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि हिंडेंनबर्ग रिसर्च या संस्थेतला वाद पेटलाय.;
भारतीय उद्योगपती गौतम अदानींच्या अडचणींमध्ये वाढ होतेय. न्यूयॉर्क स्थित Hindenburg Research या संस्थेनं गौतम अदानींच्या विविध कंपन्यांवर बुधवारी (२५ जानेवारी) गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्याचे जगभरात पडसाद उमटले आणि त्यानंतर एका दिवसातच अदानींना तब्बल ८० हजार कोटी रूपयांच्या बाजार भांडवलाचा जोरदार फटका बसलेला आहे. याविरोधात अदानी समूहानं Hindenburg Research विरोधात कायदेशीर लढाईचा इशारा दिला होता. त्याला आता Hindenburg Research नं जोरदार प्रत्युत्तर देत आता कारवाई कराचं, आमच्याकडे भली मोठी यादीच आहे, जी आम्ही कायदेशीर कारवाई दरम्यान सादर करू, असं ट्विट केलंय. त्यामुळं अदानी विरूद्ध Hindenburg Research यांच्यातील वाद आणखीच चिघळलाय.
Hindenburg Research ही संस्था शेअर बाजारावर संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेनं गेल्या बुधवारी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांवर शेअर बाजारात हस्तक्षेप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मागील काही दशकांपासून अदानी यांच्या कंपन्यांकडून अनेक फसव्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, असा गंभीर आरोपही Hindenburg Research या संस्थेनं केलाय. यासंदर्भातला सविस्तर अहवाल या संस्थेनं प्रकाशित केला आहे. या अहवालानंतर अदानींना तब्बल ८० हजार कोटींच्या बाजार भांडवलाचा फटका बसला आहे.
हा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर अदानी यांनी प्रसार माध्यमाद्वारे धमक्या दिल्याचं Hindenburg Research चं म्हणणं आहे. मात्र, आम्ही उपस्थित केलेल्या कुठल्याही मुद्द्यावर अदानी स्पष्टीकरण देऊ शकलेले नाहीत. अहवालात पारदर्शकता राहावी म्हणून आम्ही अदानी यांना थेट ८८ प्रश्न विचारले होते, ज्याची उत्तरं त्यांनी देणं अपेक्षित होतं. मात्र, अदानी यांनी अहवाल प्रकाशित झाल्यानंतर ३६ तास उलटले तरी उत्तरं दिलेली नाहीत, असं Hindenburg Research नं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
दोन वर्षांच्या मेहनतीतून आमच्या टीमनं हा अहवाल तयार केलाय. अदानी यांनी आमच्या १०६ पानी, ३२ हजार शब्दांचा अहवाला वाचायला पाहिजे होता. मात्र, तो न वाचताच त्यांनी 'संशोधन न करता' केलेला अहवाल असं म्हटलंय. त्याचबरोबर अमेरिका आणि भारतीय न्यायालयात या अहवालाविरोधात दाद मागणार असल्याचं अदानी समूहानं म्हटल्याचं Hindenburg Research नं ट्विटमध्ये म्हटलंय. अदानींनी दिलेल्या कारवाईच्या इशा-याला प्रत्युत्तर देत Hindenburg Research नं स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "आम्ही याचं स्वागतच करू. आम्ही तयार केलेल्या अहवालावर ठाम असून त्याअनुषंगानं होणा-या कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर लढाईचा आम्ही मेरिटवरच सामना करू".
"अदानी जर आमच्यावर कारवाई करण्यासाठी खरंच गंभीर असतील तर त्यांनी अमेरिकनं न्यायालयात आमच्याविरोधात खटला चालवावा, आमच्याकडे कागदपत्रांची भली मोठी यादीच आहे, असा इशाराही Hindenburg Research नं अदानी यांना दिलाय.